घरमुंबईआजारी मुलासाठी घेतलेल्या मोबाईलची चोरी

आजारी मुलासाठी घेतलेल्या मोबाईलची चोरी

Subscribe

वडील आणि मुलाच्या आनंदाचा विरस

‘पप्पा मला पण इतर मुलांसारखे मोबाईलवर कार्टून बघायचे आहे, गेम खेळायचा आहे, मला पण तसाच मोबाईल घेऊन या’, रुग्णालयात उपचार घेणार्‍या ३ वर्षांच्या मुलाचे हे वाक्य ऐकून त्या बापाचे काळीज तुटत होते. उपचारासाठी कसेबसे पैसे जमा केले, त्यात १० ते १२ हजार रुपयाचा मोबाईल कसा घेऊ म्हणून विचारात बसलेल्या बापाने मुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन १४ हजार रुपयांचा मोबाईल फोन विकत घेतला. मात्र मुलाची हौस पूर्ण होण्यापूर्वीच मोबाईल फोनची रुग्णालयातून चोरी झाली. आधीच गरीबी त्यात कर्ज काढून घेतलेल्या मोबाईची चोरी झाल्यामुळे बापाची झोपच उडाली होती. मात्र मोबाईल परत मिळवण्यासाठी या गरीब बापानेच रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाच्या मदतीने चौथ्या दिवशी मोबाईल फोन चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

दिलीप राठोड असे या बापाचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे राहणारे दिलीप राठोड हे अलिबाग मध्ये ७ हजार रुपये महिना मानधनावर तेथील एका सरकारी कचेरीत नोकरी करतात. त्यांना दोन अपत्य असून एक मुलगा ४ वर्षाचा असून दुसरा ३ वर्षाचा आहे. दोन महिन्यापूर्वी त्यांचा ३ वर्षाचा मुलगा प्राज्वल हा घरी खेळता खेळता पडला आणि त्याच्या पायाला मार लागला होता. स्थनिक डॉक्टराकडून उपचार करून काही फरक पडत नसल्यामुळे अखेर दिलीप राठोड यांनी एप्रिल महिन्यात मुलाला परळच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मुलाच्या पायाला इन्फेक्शन झाल्यामुळे ऑपरेशन करावे लागेल, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

मुलाच्या उपचारासाठी दिलीपने गावातून कसेबसे पैसे जमा करून मुलाला केईएम रुग्णालयात दाखल केले. केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील लहान मुलाच्या वॉर्डमध्ये प्राज्वलला दाखल करण्यात आले होते. त्या वॉर्डात अनेक मुले उपचारासाठी दाखल होती. प्रत्येक मुले मोबाईल फोनवर कार्टून बघत होती, तर काही मुले मोबाईलवर गेम खेळत होती. प्राज्वल हे सर्व बघत होता, त्यालाही कार्टून बघायचे होते, गेम खेळायचा होता. परंतु त्याच्या वडिलाकडे साधा फोन होता. प्राज्वलने वडिलांकडे इतर मुलांसारखे मलाही कार्टून बघायचे आहे, गेम खेळायचा आहे, मलाही असाच मोबाईल पाहिजे म्हणून मागणी केली. खिशात जेमतेम उपचारसाठी आणलेले पैसे, त्यात जेवणाचा खर्च, मुलाला मोबाईल कसा घेऊन देऊन म्हणून विवंचनेत सापडलेल्या दिलीप राठोड या पित्याने मुलाच्या हट्टापायी नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले. नोकिया कंपनीचा १४ हजार रुपयाचा नवाकोरा मोबाईल विकत घेऊन मुलाला खेळायला दिला. वडिलांनी घेतलेल्या मोबाईल फोनवर मुलगा कार्टून बघत होता. ते पाहून वडिलांनाही ही खूप आनंद झाला. मात्र हा आनंद फार वेळ टिकला नाही.

२७ मे रोजी रात्री रुग्णालयातील वॉर्डच्या बाहेर आपल्या दुसर्‍या मुलासोबत झोपलेल्या दिलीप यांच्या खिशातून नुकताच घेतलेला मोबाईल चोरीला गेला. सकाळी उठल्यावर मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच दिलीप यांनी संपूर्ण रुग्णालय, वॉर्ड तपासले परंतु मोबाईल मिळला नाही. दिलीप यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली. मोबाईल चोरीला गेल्याचे जेवढे दुःख दिलीप यांना झाले नाही तेवढे दुःख मुलाच्या चेहर्‍यावरील गेलेला आनंद बघून झाले. त्यांनी मोबाईल चोरट्याचा शोध घेण्याचे ठरवून रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाची मदत घेतली. रुगणालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता मोबाईल चोरणारा कॅमेरात कैद झाला.

- Advertisement -

आज ना उद्या चोरटा पुन्हा येईल म्हणून दिलीप यांनी चार दिवस जागून काढले आणि चौथ्या दिवशी रात्री तेच चोर रुग्नालयात त्याच वॉर्डजवळ आले असता दिलीप यांनी त्यांना ओळखले. चोर चोर ओरडत तीन जणांपैकी एकाला पकडले. इतर दोघांना तेथील इतर रुग्णाच्या नातेवाईकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भोईवाडा पोलिसांनी या तिन्ही चोरांना अटक केली. त्यात एक अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप दिलीप यांचा मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेला नाही. लवकरच तो हस्तगत करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -