घरमुंबईऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी बनला चोर

ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी बनला चोर

Subscribe

पुण्यातील कोंढवा परिसरातून झाली अटक

ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करणार्‍या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण मागवलेल्या वस्तूंंवरुन बर्‍याचदा ग्राहकांची फसवणूकही होते. या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना पुण्यात राहणार्‍या एका इसमाने धडा शिकवण्यासाठी वेगळाच फंडा वापरला. ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांकडून महागडे साहित्य मागवून त्या साहित्याचे पैसे न देताच तो पळून जायचा. अखेर मोठ्या शिताफीने ताडदेव पोलिसांनी या चोराला पुण्यातील कोंढवा भागामधून अटक केली.

नरेंद्र शर्मा (५४) असे या आरोपीचे नाव असून त्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात शर्मा याचा ४ बीएचके (ड्युप्लेक्स) फ्लॅट असून त्याची दोन्ही मुले चांगल्या नोकरीला आहेत. शर्मा याचा एक मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो, तर दुसरा मुलगा पेशाने इंजिनियर आहे. सगळ्या सुख-सुविधा मिळत असूनही ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने हा पर्याय निवडला. अनेक मोठमोठ्या कार्यालयांच्या बाहेर थांबून तो ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन वस्तू मागवत असे. वस्तू मागवताना तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी काम करणार्‍या एका मोठ्या व्यक्तीच्या नावाचा वापर करायचा. ऑनलाईन कंपनीकडून त्या वस्तूची ऑर्डर मिळताच पैसे न देताच तो पार्सल घेवून पसार व्हायचा. या प्रकरणी मुंबईत त्याच्याविरोधात अनेक गुन्हे नोंदवले असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत त्याने अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

जुलै २०१७ मध्ये मुंबईतील ताडदेवमधील भाटिया हॉस्पिटलमध्ये आरोपी नरेंद्र शर्मा याने अशा प्रकारचा गुन्हा करून पळ काढला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून ताडदेव पोलीस त्याचा शोध घेत होते. भाटिया हॉस्पिटलमधील डॉ. शर्मा या नावाचा वापर करुन त्याने ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन ८५ हजार रुपये किंमतीचा महागडा मोबाईल मागवला होता आणि त्याचे पैसे न देताच तिथून पसार झाला होता. या घटनेनंतर ताडदेव पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, मात्र अनेकदा तो पोलिसांना हुलकावणी देत होता. मुंबईत पवई, कुलाबा, ताडदेव पोलीस ठाण्याबरोबरच अनेक पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद झाले होते. ऑनलाईन कंपन्यांची अशा प्रकारे फसवणूक करणार्‍या आरोपीला पकडण्यासाठी ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील आणि पोलीस नाईक नरेश गोदे यांनी हि कामागिरी करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

घर घेण्याच्या बहाण्याने पोलिसांनी पकडले
ताडदेव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील आणि पोलीस नाईक नरेश गोदे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी नरेंद्र शर्मा याच्या मागावर होते. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शर्मा हा पुण्यातील कोंढवा परिसरात एका अलिशान घरात राहत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी त्याची सर्व माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांच्या भितीने घरातून बाहेर पडला नसल्याचे समजले. याबरोबरच आरोपी त्याचे घर विकणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. म्हणून एका दलालाच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या घरात प्रवेश मिळवला आणि त्याला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -