घरमुंबईठाण्यात आगीच्या तीन घटना

ठाण्यात आगीच्या तीन घटना

Subscribe

दोन ठिकाणी गॅस गळती,ट्रान्सफॉर्मरला आग,चिमुकलीसह महिला जखमी

ठाण्यात लुईसवाडी मैत्री हाईट समोर गॅस गळती झाल्याने उडालेल्या भडक्यात एक महिला आणि चार वर्षांची चिमुरडी भाजल्याची घटना घडली, तर दुसर्‍या घटनेत पोलीस लाईनीतील एका घरात गॅस गळती झाली. सुदैवाने यात कुणाला इजा झाली नाही, तर बाळकूम येथेही ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. मात्र, या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले.

ठाण्याच्या जीवन ज्योती सोसायटी जवळ, मैत्री हाईट समोर, लुईसवाडी, येथे घरगुती सिलिंडरचा गॅस लिकेज होऊन आगीचा भडका उडाला. या आगीच्या भडक्यात अनिता शर्मा (30) आणि चार वर्षांची चिमुरडी पियुश शर्मा होरपळल्या. या घटनेत अनिता शर्मा ही 70 ते 80 टक्के भाजल्याने त्यांना त्वरित ऐरोलीच्या बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पालिका आपत्ती व्यवस्थापनाची टीम अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी धाव घेतली.

- Advertisement -

दुसरी गॅस गळतीची घटना पोलीस शाळेजवळ असलेल्या रवी बिल्डिंगमध्ये नवव्या माळ्यावर राहणारे पोलीस उपनिरीक्षक मंगेश कड यांच्या घरातील सिलिंडरची गळती झाली. या घटनेत घटनास्थळी पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.

ठाण्यात आगीची तिसरी किरकोळ घटना बाळकूम परिसरात घडली. बाळकूम पाडा एकमध्ये गणेशवाडीत असलेल्या एमएसईडीसीच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने धाव घेऊन आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले. यातही कुठलीच जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -