घरमुंबईपाऊस जोमात, मध्य, हार्बर रेल्वे कोमात !

पाऊस जोमात, मध्य, हार्बर रेल्वे कोमात !

Subscribe

स्थानकांमध्ये प्रवासी अडकले,सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड

शुक्रवार रात्रीपासून धो-धो पडणार्‍या पावसाने मुंबई आणि उपनगरातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. तसेच शनिवार सकाळीपासून सुरू झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सायन, कुर्ला, चुनाभट्टी, ठाणे, कल्याण, उल्हासनगर स्थानकांतील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या होत्या. तर अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलची सेवा बंद झाली. त्यातच दुपारी हार्बर स्थानकाच्या मानखुर्द स्थानकाजवळ पुलाच्या स्ॅलबचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले.

दिवसभरात मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील वाहतुकीचे वेळापत्रक कोलडल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागला. तर पावसामुळे मुंबई शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा खोंळबा झाला होता. त्यामुळे बेस्टने अनेक मार्गावरील बेस्ट वळविण्यात आल्यामुळे मुंबईकरांची चांगलीच कोंडी झाली. मात्र सायंकाळी साडे चार वाजता पाऊस कमी होताच रेल्वे आणि रस्ते वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

- Advertisement -

शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला होता. याचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसला. कल्याण, ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानकांवरील रेल्वे रूळ पाण्या खाली गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सकाळीपासून धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना कार्यालयात पोहचताना उशीर झाला. तसेच कुर्ला-चुनाभट्टी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने हार्बर सेवा ठप्प झाली होती. दोन्ही बाजूच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

यामुळे अप-डाऊन दोन्ही लाइन्स एक तास बंद होत्या. तर कुर्ल्याजवळ लोकल ट्रेनचा ट्रान्सफॉर्मर जळल्याने ट्रेनमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ट्रेन पुढे जात नसल्याने प्रवासी खाली उतरून हाल अपेष्टा सहन करत भर पावसात शेजारच्या स्थानकाकडे चालत जात होते. तसेच कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पनवेल ते सीएसएमटी वाहतूक ठप्प झाली होती. तर कुर्ला वडाळा दरम्यान पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. शनिवारी सकाळी कार्यालयात जाणार्‍या प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातूनच घरी परतावे लागले. शनिवारी सकाळपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यत मध्य आणि हार्बर मार्गवरील रेल्वे वाहतूक खोळंबली होती.

- Advertisement -

प्रवाशांच्या मदतीला धावून आली बेस्ट
कामावरून घरी परतणार्‍या प्रवाशांसाठी लोकल रेल्वेची सेवा नसल्यामुळे अनेकांनी बेस्ट आणि एसटीकडे धाव घेतली. त्यामुळे दादर आणि सीएसएमटीच्या बेस्ट बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने 96 विशेष बस चालवल्या. तसेच वडाळा डेपोतून वाशीसाठी १8 विशेष बस चालविण्यात आल्या. मात्र प्रवाशांची गर्दी जास्त असल्यामुळे बेस्टच्या बसेससुद्धा कमी पडत होत्या. सीएसएमटीहून वाशीला जाणार्‍यांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या. पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे तब्बल २८ बेस्टचे मार्ग बदलण्यात आले होते.

रेल्वे स्थानकांवर गर्दी, प्रवाशांचे हाल
शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर आणि मेन लाईनवरील वाहतूक ठप्प झाली. रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यातून वाट काढत लोकल गाड्यांची वाहतूक अतिशय संथगतीने सुरु होती. तब्बल अडीच तासानंतर कुर्ल्याहून कल्याणला पहिली लोकल रवाना झाली. त्यामुळे तब्बल अडीच तास प्रवाशांचा खोळंबा झाला. अखेर कुर्ल्याहून पहिली लोकल रवाना झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. मात्र अडीच तासानंतरही हार्बर मार्गावरील वाहतूक कोलमडल्याने या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दादर ते ठाणे दरम्यान रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाण प्रवाशांचे हाल झाले.

रेल्वे ट्रॅकवरचा जीवघेणा प्रवास
मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेच्या खोळंब्यामुळे प्रवासी वैतागले होते. रेल्वे स्थानकांवर लोकलची वाट पाहत प्रवासी ताटकळत उभे होते. गाड्या नेमक्या का रद्द केल्या जात आहेत किंवा स्थानकात का थांबविण्यात येत आहेत, याची नेमकी माहिती प्रवाशांना मिळत नसल्याने प्रवासी गोंधळात पडले होते. पाण्यात अडकलेल्या लोकल गाड्यांमधून खाली उतरुन पाण्यातून वाट काढत प्रवाशांनी जवळचा रस्ता गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेल्वे पोलिसांनासुद्धा प्रवाशांना रेल्वे रुळावरून बाहेर काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. तर अनेकांनी बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले.

सायंकाळी रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
शनिवारी दिवसभर मध्य आणि हार्बर मार्गवरील रेल्वे वाहतूक कोलमडली होती. मात्र दुपारी ३.३० वाजल्यानंतर पाऊस थांबताच, हळूहळू मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली. मात्र हार्बर मार्गावर सिंग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला. त्यामुळे पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मात्र बिघाड दुरुस्त केल्यावर लोकल सेवा उशिरा पूर्ववत झाली. मात्र तेव्हापर्यंत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती.

विमानांना विलंब
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीलादेखील बसला. कमी दृश्यमानता व खराब हवामानामुळे काही विमानांची उड्डाणे आणि आगमनाला विलंब झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी उड्डाण होणार्‍या एकूण १२ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.

रस्ते वाहतूक मंदावली
शहरातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्याच्या खाली गेल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे मंदावली. पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. सायन-पनवेल हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली होती. लालबाग, सायन, हिंदमाता, परळ, गांधी मार्केट या भागात पाणी भरले होते. लोकलच्या गोंधळामुळे अनेकांनी रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. परंतु रस्ते वाहतूकही संथगतीने सुरू होती. शनिवारी दुपारपर्यंत बेस्टच्या ४८ बसेस ब्रेकडाऊन झाल्या होत्या. त्यामध्ये १७ बसेस पाण्यामुळे ब्रेक डाउन झाल्या होत्या.

वाशी, बेलापूर, पनवेल लोकल सेवा बंद
हार्बर मार्गावरील वडाळा, चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी भरल्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल लोकल सेवा बंद करण्यात आली. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या रेल्वे स्थानकांमध्ये एका मागोमाग एक उभ्या राहिल्या. टिळकनगर स्थानकाजवळ सीएसएमटीकडे जाणार्‍या लोकलच्या रांगा लागल्या. परिणामी गाड्यांची गर्दी झाली. त्यामुळे अप आणि डाउन मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वाशी ते पनवेल आणि वडाळा ते बांद्रा, अंधेरी, गोरेगाव लोकल सेवा मात्र सुरू होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -