घरमुंबईट्रॅकमनने केला एक लाखांचा मुद्देमाल परत

ट्रॅकमनने केला एक लाखांचा मुद्देमाल परत

Subscribe

परिस्थितीने गरीब, पण प्रामाणिकपणाची श्रीमंती

मुंबईतील लोकल प्रवासादरम्यान अनेकदा आपले मौल्यवान सामान, वस्तू चोरीला जाते अथवा आपण विसरतो. गहाळ झालेल्या अशा वस्तू परत मिळण्याची शक्यता खूप कमीच असते. सापडलेले सामान प्रामाणिकपणे परत करणार्‍या माणसांची संख्या अगदी विरळच. पण परिस्थितीने गरीब असलेल्या रेल्वे ट्रॅकमनने त्याला लोकल ट्रेनमध्ये सापडलेली सुमारे एक लाख ३० हजार रुपयांचा (१ लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ हजार रोख, १५ हजारांचा मोबईल, टायटन घड्याळ) असा मौल्यवान ऐवज असलेली बॅग मूळ मालकाला परत मिळवून दिली. गरीब असतानाही आपली माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपणार्‍या या ट्रॅकमनचे कौतूक होत आहे.

इरेश उप्पर (४५) असे या ट्रॅकमनचे नाव आहे. तो केरळचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्या बॅगच्या मालकाचा शोध घेऊन बॅग मौल्यवान दागिने आणि रोख रकमेसह त्यांच्या हवाली केली. नालासोपारा परिसरात राहणार्‍या अंकिता धर्मेंद्र यादव (३२) या शुक्रवारी सकाळी काही कामानिमित्त बोरीवलीला आल्या होत्या. आपले काम आटोपून त्या दुपारी साडेबाराच्या सुमारास बोरीवलीहून नालासोपार्‍याला उतरल्या. मात्र या प्रवासादरम्यान लोकलमध्ये त्या आपली बॅग विसरल्या होत्या. या बॅगेत १ लाख रुपये किमतीचे तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच हजार रुपये रोख रक्कम, १५ हजार रुपये किमतीचा स्मार्टफोन, टायटनचे महागडे घड्याळ आणि इतर ऐवज होता. बॅग विसरल्यामुळे एवढा सगळा ऐवज गहाळ होणार असल्याच्या शक्यतेमुळे त्या प्रचंड घाबरल्या होत्या. दरम्यान एका प्रवाशाने त्यांना रेल्वे पोलिसांच्या १५१२ या हेल्पलाईनवर फोन करून तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी त्या हेल्पलाईनवर फोन करुन तक्रार दिली.

- Advertisement -

कंट्रोल रुमवरुन आलेल्या आदेशाप्रमाणे अंधेरी रेल्वे पोलिसांनी बॅग शोधण्याचे काम सुरू केले. पण दोन तीन लोकल ट्रेनमध्ये शोधूनही बॅग सापडली नाही. दरम्यान अंकीता यादव या ज्या ट्रेनमधून बोरीवलीहून नालासोपाराकडे गेल्या होत्या तीच ट्रेन विरारहून चर्चगेटसाठी पुन्हा निघाली होती. यादरम्यान विरारहून लोकलमधून येणारे ट्रॅकमन इरेश उप्पर हे अंधेरीकडे येत असताना सेकंड क्लास डब्यात ही बॅग त्यांच्या नजरेस पडली. दुपारच्या वेळी गर्दी कमी असल्याने ही बॅग ताब्यात घेऊन त्यांनी सहकारी प्रवाशांना बॅग कोणाची आहे का याबद्दल विचारले. पण कोणीही आपली बॅग आहे असे म्हणत पुढे न आल्याने त्यांनी अंधेरीला उतरून थेट स्टेशन मास्टर कार्यालय गाठले आणि या बॅगबद्दल स्टेशनमास्टरांना कल्पना दिली.अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ९ वर ड्यूटीवर असणारे स्टेशन मास्टर सरोवरे खान यांनी ही बॅग ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांना याबाबत सांगितले. पोलीस हवालदार विलास पायमोडे यांनी सदर बॅग आणि ट्रॅकमन इरेश उप्पर यांच्यासहीत पोलीस ठाण्यात येऊन बॅगेत असणार्‍या मोबाईलच्या सहाय्याने बॅगेच्या मूळ मालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुपारीच अंकीता यादव यांनी हेल्पलाईनवरून बॅग हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर यादव यांना पोलिसांकडून कॉल गेला आणि त्यांनी सांगितलेल्या वर्णनासारखीच एक बॅग पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

नालासोपारा परिसरात राहणार्‍या अंकीता यादव यांनी बॅग मिळवण्यासाठी लागलीच अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्या पोलीस ठाण्यात पोहोचताच रेल्वे पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन आणि शहानिशा करून अंकीता यादव यांच्याकडे त्यांची बॅग सोपवली. या सगळ्या प्रकारात बॅग परत मिळण्याचे कारण ठरलेल्या ट्रॅकमन इरेश उप्पर यांचे अंकीता यादव यांनी मनापासून आभार मानले आहेत. इरेश उप्पर हे मूळचे केरळचे रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत ट्रॅकमन म्हणून काम करतात. त्यांच्या या कामासाठी त्यांना अगदी तुटपुंजा पगार मिळतो. ही पैशांची कमतरता त्यांच्या प्रामाणिकपणाच्या आड आली नाही. त्यांनी निःस्वार्थ भावनेने पोलिसांच्या मदतीने मौल्यवान वस्तू असलेली बॅग मूळ मालकाला परत मिळवून दिली.

- Advertisement -

रेल्वेतून प्रवास करताना दररोज असंख्य चोरीच्या तक्रारी येत असतात. अशावेळी एखादी गोष्ट सापडली असल्यास ती कोणीही परत करत नाही. पण या ट्रॅकमनने प्रामाणिकपणा दाखवत इतका महागडा ऐवज असूनदेखील पोलिसांना परत केला आणि त्यामुळेच आम्ही तो त्याच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचवू शकलो. इरेश उप्पर यांचे करावे तितके कौतूक कमीच आहे.
-प्रमोद बाबर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,रेल्वे पोलीस ठाणे, अंधेरी.

मी माझ्या एका महत्त्वाच्या कामासाठी म्हणून सकाळीच घरातून बाहेर पडले होते. बोरीवलीला माझे काम आटोपल्यानंतर मी घरी येण्यासाठी निघाले. मात्र नालासोपारा स्थानकात उतरताना डब्यात ठेवलेली बॅग मी विसरले. लोकलमधून उतरल्यानंतर काही वेळातच ही गोष्ट माझ्या लक्षात आली; पण काय करायचे सुचत नव्हते. पोलिसांकडे मी तक्रार दिली; पण त्यांनाही बॅग सापडली नाही. अखेर इरेश उप्पर हे ट्रॅकमनचे काम करणार्‍या भल्या माणसाने प्रामाणिकपणे बॅग पोलिसांकडे दिली. म्हणून हा ऐवज मला परत मिळू शकला अन्यथा तो मिळेल की नाही या संभ्रमात मी होते. उप्पर आणि रेल्वे पोलिसांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. -अंकीता धर्मेंद्र यादव, (गृहिणी) नालासोपारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -