घरCORONA UPDATEकूपर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; आठ तास दोन कोरोनाबाधित मृतदेह खाटेवरच

कूपर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; आठ तास दोन कोरोनाबाधित मृतदेह खाटेवरच

Subscribe

मुंबईत कोरोना रुग्णांवर महापालिकेच्यावतीने योग्यप्रकारे उपचार केले जात असून कोरोनाबाधित मृत व्यक्तींची विशेष काळजी घेत मृतदेह विशिष्टप्रकारे बंदिस्त करून नातेवाईकांना सुपूर्द करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेच्यावतीने केला जात आहे. परंतु गुरुवारी महापालिकेच्या कूपर रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला. येथील आयसोलेशन कक्षात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानंतर आठ तास उलटून गेल्यानंतरही त्याला हात लावला गेला नव्हता. आठ तास कोरोनाग्रस्ताचा मृतदेह खाटवर तसाच पडून होता आणि त्याला कुणीही हात लावायला तयार नव्हता.

मुंबईतील कस्तुरबा, केईएम पाठोपाठ कूपर रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जातात. परंतु या रुग्णालयातील कोरोना विशेष कक्षात उपचार सुरु असलेल्या दोन रुग्णांचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. एखाद्या रुग्णाचे निधन झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने मृताचा देह विशिष्ट पध्दतीने बंदिस्त करून महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांच्यात अंतसंस्कारासाठी सुपूर्द केला जातो. परंतु आठ तास उलटून गेले तरी या मृतदेहाला रुग्णालयातील वॉर्डबॉय तसेच इतरांनी हात लावण्यास नकार दिला. त्यामुळे खाटेवर मृतदेह पडून राहिला होता. याबाबत कक्षातील इतर रुग्णांनी ही बाब डॉक्टर आणि इतरांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतरही हे दोन्ही मृतदेह तिथेच पडून होते. वॉडबॉय आणि नर्स यांनी आपल्याजवळ पीपीई किट नसल्यामुळे आपण पुढे जात नसल्याचे सांगितले तर कुणी पोलीस कार्यवाही बाकी असल्याने त्याला हात लावला जात नसल्याचे सांगितले.

- Advertisement -

मात्र, वॉर्डात मृत रुग्ण तसेच खाटेवर पडून राहिल्याने याचा परिणाम तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांवर होत होता. अनेक रुग्ण हा प्रकार पाहून चिंतेत पडले असून काही रुग्ण तर घाबरुन गेले आहेत. दरम्यान रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांनी मी स्वत: मृतदेह हलवले असल्याचे सांगितले. तर मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी कूपर रुग्णालयात पहाटेच्या सुमारास या दोघांचा मृत्यू झाला होता. परंतु गुरुवारी दुपारी एक वाजेपर्यंत हे मृतदेह हलवले नव्हते, असा आरोप केला आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे एक रुग्ण हा विकासनगर या परिसरातील होता. त्याची कोरोनाची चाचणी झाली होती. परंतु त्याचा मृत्यू ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला. पण त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात आज डॉक्टर वगळता आयसोलेशन वॉर्डात कुणालाही पीपीई किट दिले जात नाही. त्यामुळे अशा रुग्णांच्या जवळ डॉक्टर वगळता कुणी जात नाही. जर नर्स, वॉडबॉय यांना पीपीई किट दिले तर त्यांनी त्या मृतदेहाला हात लावला असता. त्यामुळे सुरक्षेअभावी कुणीही मृतदेहाला हात लावायला तयार होत नाही. अशाचप्रकारे येथीलच वैशालीनगर मधील एका डायलिसिस रुग्णाला कोरोनाची बाधा झाली होती. त्याची चाचणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्याचा मृत्यू झाला. परंतु त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या मृतदेहाला कुणी हात लावला नव्हता. तब्बल २८ तास हा मृतदेह घरात होता. त्यानंतर महापालिकेचे कामगार आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाचा दुर्लक्ष होताना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -