घरमुंबईनकोसा झालाय बाजार... महाभयंकर महागाईचा आजार!

नकोसा झालाय बाजार… महाभयंकर महागाईचा आजार!

Subscribe

इंधनदराची सातत्याने होणारी वाढ आणि शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाने मुंबईतील गृहिणी अक्षरश: मेटाकुटीस आल्या आहे. कमाईपेक्षा गृहोपयोगी वस्तूंवरील खर्च अधिक होऊ लागल्याने मुंबईकरांना बाजारच नकोसा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. ७२ रुपयांवर रोखल्या गेलेल्या पेट्रोलने आता ८५ रुपयांचा पल्ला गाठला आहे. तर मालाची वाहतूक करणाऱ्या डिझलचे दरही ७३ रुपयांवर पोहोचले आहेत. इंधनातील या वाढत्या दरवाढीने मालाची दरवाढ गगनाला जाऊन भिडली आहे. मालवाहतुकीचे दर सरासरी २२ टक्क्यांनी वाढवण्याची मागणी माल वाहतूकदारांच्या संघटनांनी केली आहे. दरवाढ होण्याआधीच किरकोळ बाजारातील मालाचे दर झपाट्याने वाढले आहेत. सरासरी २० टक्के इतर दरवाढ किरकोळ बाजारात दिसून येत आहे.

कृषी मालातील वस्तूंची आवक मंदावली

शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाच्या कालच्या तिसऱ्या दिवसात मुंबईत येणाऱ्या मालात सरासरी २५ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे मालाचे दर अधिकच वाढले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कृषीमालाची आवक झपाट्याने खाली येत आहे. मुंबईसारख्या शहरांना याचा जबर फटका बसतो आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवी मुंबईतील मुख्यालयात येणाऱ्या मालावरही या संपाचा फटका बसला आहे. कृषी मालातील बहुतांश वस्तूंची आवक मंदावली असल्याचे सांगण्यात आले. देशातल्या जनतेला या दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. सामान्यांच्या आवाक्याबाहेर ही दरवाढ गेल्याने गृहिणींना घर चालवणे अवघड बनले आहे.

“सगळीच महागाई झाल्याने आमचे नियोजन बिघडले आहे. दरवाढ किती होईल, हे कोणीही सांगत नाही. सरकारने तर ‘आपले काही देणेघेणे नाही’, असाच दृष्टीकोन ठेवल्याने ग्राहकांना कोणी वाली राहिलेला नाही. इंधन दरवाढीचा परिणाम पूर्वी वाहतूकदारांवर व्हायचा. आता तो सामान्यांना अधिक बसतो. ही परिस्थिती बदलली तरच जगणे सुसह्य होईल “
राजेश्री शाहू, गृहिणी, मुंबई

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या संपामुळे मुंबईत येणाऱ्या भाज्यांची आवक खूपच कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किंमतीवर पडला आहे. बाजारात भाजीचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. मुंबईच्या दादर भाजी मंडईत येणाऱ्या मालात ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

“वाढती महागाई आणि शेतकरी संपामुळे बाजारात ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या किंमतीही सतत वाढत आहेत. अशावेळी नेहमीच्या ग्राहकालाही भाजी घ्या, असे सांगायची हिंमत होत नाही. किरकोळ व्यवसाय करणारे घायकुतीला आले आहेत “
मंगेश चटप, भाजी विक्रेता

घाऊक बाजारात भाजीचे दर सरासरी २० इतक्या टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात या भाजीने २५ टक्क्यांचा पल्ला गाठला असल्याचे दादर मंडईतील व्यापारी राकेश कुमार यांनी सांगितले. ही परिस्थिती अशीच राहिली तर व्यवसाय करणे अवघड जाईल, अशी भीती राजेश यांनी व्यक्त केली.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -