घरमुंबईसंजीव जैस्वाल यांच्या स्वप्नांचे ओझे आयुक्त सिंघल यांच्या खांद्यावर

संजीव जैस्वाल यांच्या स्वप्नांचे ओझे आयुक्त सिंघल यांच्या खांद्यावर

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा जैस्वाल यांना फटका?

मागील कित्येक महिन्यापासून बदलीसाठी मागणी करणार्‍या तत्कालीन आयुक्त संजीव जैस्वाल यांना अखेर दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जागी आता विजय सिंघल यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या सोमवार किंवा मंगळवारी ते आयुक्तपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. परंतु ही नियुक्ती होत असताना मावळते आयुक्त जयस्वाल यांना सध्या तरी कोणतेही खाते देण्यात आलेले नाही. परंतु आता मागील चार वर्षात जो काही ठाणेकरांच्या स्वप्नांचा डोलारा जयस्वाल यांनी उभा केला आहे. तो पूर्ण करण्याचे आव्हान सिंघल यांच्यापुढे असणार आहे. मात्र त्याच बरोबर नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा फटका जयस्वाल यांना बसला असून त्यांना अद्याप कोणती ही नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही. जैस्वाल हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके अधिकारी म्हणून ठाण्यात ५ वर्षे सलग आयुक्तपदी राहिले होते. मात्र ठाकरे सरकारने त्यांना दूर केल्याची चर्चा अधिकारी वर्गात आहे.ठाणे महापालिका आयुक्तपदी सलग ५ वर्षे २ महिने राहण्याचा विक्रम करणार्‍या संजीव जैस्वाल यांना जाता जाता अनेकांनीच धक्का दिला. ज्यांना त्यांनी आपलेसे केले होते, त्यांनीच त्यांच्यावर अखेरच्या क्षणात वार केल्याचे दिसून आले.

महापालिकेतील अंतर्गत बदल्या रद्द करण्याच्या मुद्यावरुन जयस्वाल व्यथित झाले होते. त्यानंतर त्यांनी अधिकार्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर यावरुन वादंग निर्माण केला. त्याचे पडसाद महासभेत देखील उमटले. त्यानंतर आपल्याला आता ठाणे शहरात राहायचेच नाही, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील बदलीची मागणी केली होती. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. परंतु त्याची वेळ निघून गेली होती, त्यांना बदली मिळणार नाही, म्हणूनही सांगण्यात आले होते. अखेर त्यांनी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार सोडून आपण जात असल्याचे सांगून ठाण्याचा निरोप घेतला. दरम्यानच्या काळात ते पुन्हा येतील अशी आशा काहींना वाटत होती. त्यानुसार काहींनी त्याची तयारीही केली होती. परंतु गुरुवारी या सर्वावर पाणी फेरले गेले.

- Advertisement -

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंघल हे येत्या सोमवार किंवा मंगळवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यापुढे आता जैस्वाल यांनी मागील चार वर्षात घेतलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. तसेच स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेतलेल्या विविध योजना मार्गी लावण्याचे, याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे महापालिकेवर तब्बल ३३ कोटींचे दायीत्व असल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय करण्याचे आव्हान आहे. तसेच महापालिकेची विस्कटलेली घडी, भविष्यात कामगारांचे पगार निघणार की नाही, अशी निर्माण झालेली परिस्थिती, उत्पन्न वाढीवर भर देतानाच ठाणोकरांना क्लस्टर योजना मार्गी लावण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सिंघल यांची प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्द
सिंगल यांचा जन्म १९७१ मध्ये आग्रा येथे झाला. ते १९९७ चे बॅचचे आयएसएस आहेत. सहायक जिल्हाधिकारी म्हणून मलकापूर बुलढाणा येथे १९९१ ते २००१ पर्यंत त्यांनी काम केले आहे. २०००-०१ अहमदनगर जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, २००१-०३ औरंगाबाद जिल्हापरिषद, त्यानंतर २००३ ते ०५ पर्यंत हिंगोलीचे जिल्हाधिकारी, २००५-०८ पर्यंत जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर २००८ ते ११ पर्यंत ते कोल्हापुर महापालिकेचे आयुक्त, २०११-१४ या काळात राज्याच्या साखर आयुक्तीपदी काम पाहिले आहे. २०१७ पासून ते मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांना विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -