घरमुंबईविक्रोळीचा फायरमॅन! आगीपासून मुकुंदराव आंबेडकरनगर वाचविले

विक्रोळीचा फायरमॅन! आगीपासून मुकुंदराव आंबेडकरनगर वाचविले

Subscribe

आग लागल्यास ती विझविण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? याबाबतचे  ‘अग्नीशमन स्वयंसेवक प्रशिक्षण’ मुंबई अग्निशमन दल सर्वसामान्यांना देत असते. हेच प्रशिक्षण घेऊन अमन मागाडे या तरुणाने यशस्वीरित्या आग विझविली.

आग लागल्यास ती विझविण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? याबाबतचे  ‘अग्नीशमन स्वयंसेवक प्रशिक्षण’ मुंबई अग्निशमन दल सर्वसामान्यांना देत असते. हेच प्रशिक्षण घेऊन अमन मागाडे या तरुणाने यशस्वीरित्या आग विझविली. बैठ्या चाळीतील एका घराला आग लागली आहे…घरात कोणीच नाही…या घरामुळे इतर घरे खाक होण्याचा धोका…अग्नीशमन दलाचा बंब येईपर्यंत परिस्थिती आणखी बिकट होईल.. कोणीही आग विझवण्यासाठी नाही..इतक्यात अमन मदतीसाठी येतो आणि जीवाची बाजी लावून घरे जळण्यापासून वाचवतो. विक्रोळीतील टागोर नगर येथील मुकुंदराव आंबेडकर नगरमध्ये  सोमवारी ही घटना घडली होती. अमनच्या या धाडसाचे सध्या विक्रोळीत कौतुक होत आहे.

मुकुंदराव आंबेडकर नगरात रामनाथ जाधव राहतात. मीटर बॉक्स जळाल्याने त्यांच्या घरात वीज नव्हती. सोमवारी दुपारी त्यांची मुलगी शाळेतून घरी आली, घरात तिने मेणबत्ती लावली आणि ती आई-वडिलांना दूरध्वनी करण्यासाठी घराच्या बाहेर पडली. याच दरम्यान मेणबत्तीमुळे फ्रीजवरील प्लॅस्टिकच्या कव्हरला आग लागली आणि ती पसरत गेली. आग लागल्याची ओरड ऐकून अमन मागाडे आणि राहुल मित्र मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी धावत गेले. आग विझवण्यासाठी अरुंद जागा असल्याने ते घरापर्यंत पोहचू शकत नव्हते. आग पसरत चालल्याने त्यांची चिंता वाढत होती, मागाडे यांच्या सूचनेनुसार आजूबाजूच्या घरातील लहान मुले, वृद्ध यांना बाहेर काढण्यात आले. सिलिंडर बंद करण्यात आले. आग विझवण्यासाठी मागाडे आणि त्याचे मित्र रवी इंगळे, अजय बामणे, रुपेश सावंत, किशोर सकट हे जळत असलेल्या घराच्या शेजारील घराच्या छतावर चढले आणि जळत असलेल्या घराचा पत्रा फोडला. त्यामुळे धूर जायला वाट मिळाली.

- Advertisement -

तसेच रेतीच्या गोणी टाकल्या. त्यानंतर पाणी टाकण्यात आले आणि आग विझवण्यात आली. यानंतर काही वेळाने अग्नीशमन दल आले आणि त्यांनी अमनसह स्थानिकांचे कौतुक केले. या आगीत जळालेल्या घराचे नुकसान झाले. सर्व सामान खाक झाले.  अमन याने २०१६ साली अग्नीशमन दल चालवत असलेल्या एक दिवसीय अग्नीशमन स्वयंसेवक शिबीरात सहभाग घेतला होता. त्याचा उपयोग त्याला यावेळी झाला. या शिबिरात सिलिंडरची आग, माणूस पेटला तर आग विझवणे, घराला आग लागल्यास विझवण्याच्या उपाययोजना आणि प्रात्यक्षिक आदी शिकवण्यात आले होते. त्याचाच फायदा अमन यांना यावेळी झाला आणि आग पसरण्यापासून  मुकुंदराव आंबेडकर नगर वाचले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -