घरमुंबईहाईट कम फाईट जादा - मनसेच्या वामनरुपी जयंत दांडेकरकडून ‘भारत बंद’

हाईट कम फाईट जादा – मनसेच्या वामनरुपी जयंत दांडेकरकडून ‘भारत बंद’

Subscribe

राजकीय नेता म्हटला की त्याचा आब आणि दरारा हा नेहमीच आपल्यासमोर येतो. पण या प्रतिमेला फाटा देणारा विक्रोळीतील ‘वामनरुपी’ मनसेचा कार्यकर्ता सोमवारी ‘भारत बंद’मध्ये आघाडीवर होता. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या समस्येला वाचा फोडण्यासाठी मनसेचे वामनरुपी कार्यकर्ता जयंत दांडेकर सोमवारी कुणाचीही तमा न बाळगता रस्त्यावर उतरले. आंदोलनात बस, ट्रक, टेम्पो, रिक्षा थांबवण्याबरोबरच दुकाने बंद करण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून रस्त्यावर उतरलेल्या या दांडेकरांना पाहून मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांनाही जोश आला होता. परिणामी विक्रोळीत भारत बंद’ला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

पेट्रोल, डिझेल व वाढत्या महागाईविरोधात विरोधी पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मनसे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर सोमवारी सकाळी 6 वाजताच रस्त्यावर उतरले. त्यांना पाहून मनसेचे कार्यकर्तेही हिरीरीने रस्त्यावर उतरले. ‘मूर्ती लहान,पण कीर्ती महान’ हे दांडेकर यांनी सिद्ध करून दाखवले. दांडेकर यांची उंची सर्वसामान्यांपेक्षा कमी म्हणजे चार फूट इतकी आहे. पण त्यांची उंची कधीही त्यांच्या कामाच्या किंवा पदाच्या आड आली नाही.

- Advertisement -

विक्रोळीतील प्रत्येक नागरिकाच्या समस्येसाठी नेहमी धावून जाणारा व त्यांना सर्वतोपरी मदत करणारे म्हणून दांडेकर यांची सर्वांना ओळख आहे. त्याचप्रमाणे त्यांची उंची ही त्यांची एक वेगळी ओळख आहे.

- Advertisement -

विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरात मनसेकडून आंदोलनाला सुरुवात झाली. त्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही साथ दिली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. दांडेकर यांना पोलिसांनी सोमवारी दिवसभरात चार नोटीसा दिल्या. दांडेकर रस्त्यावर उतरल्यास विक्रोळीत बंद यशस्वी होईल, याचा अंदाज असलेल्या पोलिसांनी सकाळीच त्यांच्या घरी जाऊन त्यांना आंदोलनात सहभागी न होण्याचा इशाराही दिला. मात्र पोलिसांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करत दांडेकर सर्वसामान्यांच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरले. आंदोलन म्हटले की जोरजबरदस्ती आली. पण दांडेकरांचे आंदोलन हे वेगळ्याच पद्धतीचे असते. ते प्रत्येक दुकानदार व वाहनचालकाशी प्रेमाने बोलून त्याला दुकान व वाहन बंद करण्यास सांगतात. परिसरातही दांडेकरांबद्दल प्रत्येकाच्या मनात दरारा आणि आपलेपणा असल्याने तेही कोणताही विरोध करत नाहीत. सोमवारी आंदोलनात दांडेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्कीही करण्यात आली. यावेळी दांडेकर यांनी पोलिसांशी सौजन्याने बोलत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे निक्षून सांगितले.

विक्रोळीतील प्रत्येक नागरिकाच्या समस्येसाठी नेहमी धावून जाणारे व त्यांना सर्वतोपरी मदत करणारे म्हणून दांडेकर यांची सर्वांना ओळख आहे. दांडेकरांचे शिक्षण बी.कॉम पर्यंत झाले असून ते ५५ वर्षाचे आहेत. लांब दाढी, तीन चाकी मोटारसायकल आणि कपाळावर भगवा टिळा ही दांडेकरांची ओळख आहे. पहाटेपासूनच कामाची सुरुवात करणारे दांडेकर कामासाठी कोणीही हाक मारली की, त्वरीत धावून जातात. आपल्या मोटारसायकलवरून विक्रोळीत फेरफटका मारत नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात.

पेट्रोल, डिझेल दरवाढ करून भाजप सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही नेहमीच रस्त्यावर उतरायला तयार आहोत. सूर्य जसा उगवतो, तसा तो मावळतोही. त्याचप्रमाणे भाजपलाही सत्तेवरून लवकरच पायउतार व्हावे लागेल. – जयंत दांडेकर, शाखाध्यक्ष, मनसे

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -