घरमुंबईमालाड येथे पाणी देयके थकवणाऱ्यांचा पाणीपुरवठा तोडला; नागरिक संतप्त

मालाड येथे पाणी देयके थकवणाऱ्यांचा पाणीपुरवठा तोडला; नागरिक संतप्त

Subscribe

कारवाईची झळ बसलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याने पाणी देयके थकवल्याप्रकरणी कोणतीही नोटीस न देता मालाड पूर्व-पश्चिम या भागातील अनेक इमारतींचा, विशेषतः एसआरए योजनेतील सामान्य नागरिकांचा पाणीपुरवठा अचानक कारवाई करून तोडला आहे. त्यामुळे कारवाईची झळ बसलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पालिकेला पाण्याची देयके भरण्यास आम्ही तयार आहोत, पण आम्हाला थोडीशी मुदत व तडजोड करून दिलासा द्यायला पाहिजे होता. आम्ही हप्त्या-हप्त्याने पालिकेची थकबाकी भरायला तयार आहोत. मात्र, थेट कारवाई करून आमचे पाण्यासाठी हाल करायला नको होते. आमच्या घरच्या लोकांच्या कोरोना, लॉकडाऊन कालावधीत नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाला. आमच्याकडे पैशांची चणचण आहे. जीवनावश्यक गरज असलेल्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात येत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मालाड पूर्व आणि पश्चिम विभागातील एसआरए योजनेच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या सामान्य झोपडीधारकांच्या इमारतीनी पालिकेच्या जल अभियंता खात्याची लाखो रुपयांची पाण्याची देयके गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित ठेवली होती. तर दुसरीकडे पालिका जल अभियंता खात्याने आपल्या अधिकाऱ्यांना जलदेयकांची थकबाकी लवकरात लवकर वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते.

- Advertisement -

परिणामी, या खात्यातील अधिकाऱ्यांनी सदर इमारतीमधील वॉचमनला फक्त तोंडी निरोप देऊन जल देयके भरण्याबाबत व कारवाईबाबत तोंडी कळवल्याचे जल अभियंता खात्यातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, या खात्यामार्फत शुक्रवारी व शनिवारी सकाळपासून अनेक इमारतींचा पाणीपुरवठा कोणतीही नोटीस न देता खंडित करण्यात आला. त्यामुळे या इमारतीमधील नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींचे हाल झाले.

तसेच, या नागरिकांना पाणी पुरवठा खंडित झाल्याने आजूबाजूच्या टॉवरमधून चार हांडे पिण्यासाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागली. तर अनेकांना मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत आणून आपली व कुटुंबियांची तहान भागवावी लागली. आता सोमवारपर्यंत या नागरिकांना पाण्यासाठी या हालअपेष्टा भोगाव्या लागणार आहेत. शनिवार व रविवारी दोन दिवस सुट्टी असल्याने पालिकेचे विभाग कार्यालय आता सोमवारी उघडले जाणार आहे.

- Advertisement -

तोपर्यंत तरी या नागरिकांना पाण्याची पर्यायी व्यवस्था बाहेरूनच करावी लागणार आहे. दरम्यान, स्थानिक नगरसेविका संगीता शर्मा यांचे पती माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांनी राज्यात व मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला जबाबदार ठरवत निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -