घरमुंबईपत्रकार परिषद का घेतली; मुंबई हायकोर्टाचा पुणे पोलिसांना सवाल

पत्रकार परिषद का घेतली; मुंबई हायकोर्टाचा पुणे पोलिसांना सवाल

Subscribe

न्यायालयात प्रकरणावर सुनावणी सुरु असताना पत्रकार परिषद का घेतली असा सवाल मुंबई हायकोर्टाने पुणे पोलिसांना केला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ सप्टेंबरला होणार आहे.

भीमा – कोरेगाव हिंसाचारप्रकरण आणि पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधित असलेल्या पाच जणांना पुणे पोलिसांनी छापेमारी करत अटक केली होती. या पाचही जणांचा नक्षलवाद्यांशी संबंध असून त्या संदर्भातले सर्व पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती. पुणे पोलिसांच्या या कारवाईवरुन मुंबई हायकोर्टाने फटकारले आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरु असताना तुम्ही पत्रकार परिषद का घेतली? असा सवाल हायकोर्टाने पुणे पोलिसांना केलाय.

- Advertisement -

पत्रकार परिषद का घेतली?

पुणे पोलिसांनी राजकीय दबावातून विचारवंताना अटक केल्याचा आरोप करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. एल्गार परिषद प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून एनआयएकडे देण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने पुणे पोलिसांना खडेबोल सुनावले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तुम्ही पत्रकार परिषद का घेतली असा सवाल हायकोर्टाने पोलिसांना केला आहे. सर्व प्रतिवादींना याचिकेची प्रत मिळू न शकल्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ सप्टेंबरला होणार आहे.

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याने केली अटक

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी कवी वरावरा राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नन गोन्सालवीस यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत पुणे पोलिसांनी यांना अटक केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यात काही संगणक आणि लॅपटॉप आदींचा समावेश असून, या सर्वांचे पासवर्ड मिळाले आहेत. देशभर अस्वस्थता पसरवत कायदा आणि सुव्यवस्थेला हादरे देत हिंसक आंदोलने घडवून मोदी सरकार उलथवण्याचा कट होता, असेही तपासात निष्पन्‍न झाल्याचे पुणे पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -