घरमुंबईअवघ्या 48 तासांत 21 आरोपी जेरबंद

अवघ्या 48 तासांत 21 आरोपी जेरबंद

Subscribe

पनवेल पोलिसांचे यश

देशासह महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या अजामीनपात्र वॉरंट (नॉन बेलेबल) आरोपींचा तपास लावण्यासाठी गेली अनेक वर्षे पनवेल शहर पोलीस प्रयत्न करीत होते. मात्र, अवघ्या 5 दिवसांपूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने राबविलेल्या मोहिमेत अवघ्या 48 तासांमध्ये 21 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

फसवणूक, चोरी, घरफोडी, हाणामारी आदी गुन्ह्यातील जामीन न मिळालेले आरोपी मोकाट फिरत होते. पोलीस ठाण्याचे कर्मचारी आरोपीच्या पत्त्यावर जाऊन येतात. मात्र, त्याठिकाणी आरोपी राहत नसल्यामुळे ते वॉरंट प्रलंबित राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार भारतातील कलकत्ता न्यायालयासह, बांद्रा, पनवेल, उल्हासनगर, सीबीडी, सांगोला आदी न्यायालयांमध्ये गुन्हे प्रलंबित असलेले आरोपी मात्र मोकाट फिरत होते. पनवेल शहर पोलीस ठाण्याची सूत्रे अजयकुमार लांडगे यांच्याकडे आली असता त्यांनी पोलीस ठाण्यातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याची विशेष मोहीम राबविली.

- Advertisement -

यावेळी सन 2002 पासून अजामीनपात्र आरोपी मिळत नसल्याचे समोर आले. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे प्रमुख सुनील तारमाळे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली, यावेळी सुनील तारमाळे यांच्यासह पथकाने अवघ्या 48 तासांमध्ये 21 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये 2 आरोपी हे मृत्यू झालेले आढळून आले तर कारवाईच्या धसक्याने 5 आरोपी न्यायालयामध्ये स्वतःहून हजर झाले आहेत. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे कर्मचारी आणखी आरोपींच्या शोधात असून लवकरच आणखी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात त्यांना यश मिळणार आहे. यावेळी पकडण्यात आलेल्या आरोपींना त्या त्या न्यायालयामध्ये हजर करण्यासाठीही पथके रवाना झाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -