गणेश नाईक यांना आणखी एक धक्का; भाजप नगरसेविकेचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तनुजा मढवी यांचा पक्षप्रवेश

another bjp corporators of ganesh naik join ncp
गणेश नाईक यांना आणखी एक धक्का भाजप नगरसेविकेचा राष्ट्रवादीत प्रवेश

नवी मुंबईतील आणखी एका नगरसेविकेने भाजपला रामराम ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. जुईनगर प्रभाग क्रमांक ८३ मधील नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तनुजा मढवी यांचा पक्षप्रवेश झाला.

भाजपात गेलेले नगरसेवक, नगरसेविका एक-एक करून बाहेर पडत असल्याने आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत मोठी वाढ होत आहे. नगरसेवक राम आशिष यादव यांनी मागच्या आठवड्यात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. यादव यांनी भाजप सोडल्यामुळे ऐरोली चे आमदार गणेश नाईक यांना आणखी एक धक्का बसला. आत्तापर्यंत भाजपचे १४ नगरसेवक पक्षातून बाहेर पडले आहेत. नवी मुंबईतील भाजप नेत्यांच्या मनमानीला कंटाळून भाजपातून नगरसेवक बाहेर पडत आहेत, अशी जोरदार चर्चा नवी मुंबईतील राजकीय पटलावर आहे.

विद्यमान नगरसेवकांसह अनेक माजी नगरसेवक देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अगोदरच दाखल झाले आहेत. पक्षांतराची मोहीम जोरदार सुरू असून जर हे थांबले नाही तर नवी मुंबईचा गड राखणे आमदार गणेश नाईक यांना अडचणीचे होऊ शकते.