एपीएमसी बाजार आवारात लसीकरण केंद्र सुरू

एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचारी यांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने वाशी येथील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजार आवारात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

प्रातिनिधीक फोटो
एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचारी यांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने वाशी येथील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजार आवारात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी एपीएमसी माजी संचालक व घाऊक बाजार व्यापारी महासंघाचे प्रमुख सल्लागार शंकर पिंगळे, अध्यक्ष कैलास ताजने, गणेश पावगे, शिंगरकर, बाळा जाधव, बापू शेवाळे, डॉ. दीपक आवटे, डॉ. वंदना नारायणी उपस्थित होते. एपीएमसी बाजार हा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी याआधी ग्रोमा सेंटर येथे कोव्हीड लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच आता भाजीपाला बाजार आवारातही लसीकरण केंद्र सुरू केल्याने जास्तीत जास्त व्यापारी, कामगारांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
सद्यपरिस्थितीत पहिला डोसची जास्त आवश्यकता असताना सर्व लसीकरण केंद्रात दुसरा डोसचा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक अजूनही पहिल्या डोस पासून वंचित राहिलेले आहेत. तसेच दुसरा डोसचा कालावधी हा ८४ दिवसांचा केल्यामुळे अनेक नागरिक प्रतीक्षेत आहेत. सर्व लसीकरण केंद्रात पहिला डोस सुरू करण्याची तसेच दुसरा डोसचा कालावधी ३० दिवसांचा ठेवण्यात येण्याची गरज असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. कोविडमुळे डोळ्यांच्या होणाऱ्या आजारावरील औषधे ही प्रशासनाने मोफत पुरविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. संभाजीराजे भोसले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे, भाजीपाला आवारात सर्व सुविधांयुक्त स्वच्छता गृह उभारण्याची मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी मंदा म्हात्रे यांच्याकडे केली.
यावेळी मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी नवी मुंबई येथे घाऊक धान्यबाजार, भाजीपाला मार्केट, फळ बाजार, कांदा-बटाटा मार्केट येथे दररोज हजारो कामगार, व्यापारी व्यवसायानिमित्त काम करण्यासाठी येत असतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. एपीएमसी बाजार आवारात येणाऱ्या सर्व व्यापारी, माथाडी कामगार तसेच गुमास्ता वर्गाला कोविड लस उपलब्ध होऊन बाजार आवारामध्येच सर्वांना एकत्रित लाभ घेता यावा, याकरता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग यांची लसीकरणासाठी सातत्याने होणारी मागणी लक्षात घेता एपीएमसीच्या सर्व बाजार आवारात लसीकरण केंद्र उपलब्ध करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. एपीएमसी भाजीपाला बाजारात पुरुष व महिलांकरता दोन स्वतंत्र स्वच्छता गृहे आमदार निधीतून बांधण्यात येणार असल्याचे तसेच धर्मवीर संभाजीराजे महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –