४३१ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रात आपत्कालीन स्थितीत सेवा देण्यासाठी अग्निशमन विभागामार्फत ६४ मीटर उंच शिडीचे टर्न टेबल लॅडर वाहन तसेच ५ नवीन अग्निशमन वाहनेही खरेदी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

वसई : अमृत टप्पा २ अंतर्गत सूर्या योजनेतून महापालिकेला १८५ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२ अंतर्गत महापालिका क्षेत्रातील अस्तित्वातील पाणी पुरवठा योजना बळकटीकरणासह नवीन भागात जलवाहिन्या अंथरणे व जलकुंभ बांधण्याच्या कामासाठी रु.४९६.८१ कोटींच्या डीपीआरला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली असून सदर कामी लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करून कामे हाती घेण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांनी प्रजासत्ताक दिनी महापालिका मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात दिली.
शहरातील सांडपाण्याची योग्य प्रकिया करण्यासाठी महापालिकेमार्फत नालासोपारा (पूर्व) येथे एसटीपी-३ च्या रु.४३१.३२ कोटीच्या डिपीआरला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली असून सदर कामाची ई-निविदा लवकरच मागवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रात आपत्कालीन स्थितीत सेवा देण्यासाठी अग्निशमन विभागामार्फत ६४ मीटर उंच शिडीचे टर्न टेबल लॅडर वाहन तसेच ५ नवीन अग्निशमन वाहनेही खरेदी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने महापालिकेला १२ नवीन आरोग्यवर्धिनी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यापैकी ४ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यात आली असून ३ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे कामकाज पूर्ण झाले असून नागरिकांच्या सेवेकरता लवकरच सुरु करण्यात येतील. उर्वरित ५ आरोग्यवर्धिनी केंद्र लवकरच उभारण्यात येतील. महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात नागरिकांसाठी विविध आरोग्य चाचण्या मोफत केल्या जातात. त्याचप्रमाणे काही महागड्या चाचण्या सर्वसामान्य नागरिकांना मोफत किंवा रास्त दरात उपलब्ध करून देण्याचाही कार्यवाही केली जाईल, असेही आयुक्त पवार यांनी सांगितले.

शहर सौंदर्यीकरणाचे कामही हाती घेण्यात आले असून चौक, रस्ते, दुभाजके इ. सौंदर्यीकरणाचे काम, वृक्षारोपणाचे कामही सुरु करण्यात आले आहे. कौल सिटी येथे लवकरच उद्यान विकसित करण्यात येत आहे. तसेच मियावाकी वननिर्मिती ही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्यात आला असून सदरील कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. कोरोना काळात सामाजिक कार्य करणार्‍या विविध संस्था, नागरिक, अवयव दान केलेल्या नागरिकांच्या कुटुबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या व पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंचा तसेच महापालिका कर वसुलीच्या कामात उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील, माजी सभापती, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, पत्रकार, पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक यावेळी उपस्थित होते.