घरपालघरमीरा -भाईंदर शहरात ९५ टक्के नालेसफाई पूर्ण

मीरा -भाईंदर शहरात ९५ टक्के नालेसफाई पूर्ण

Subscribe

तर केवळ ५ टक्केच किरकोळ जागी राहिलेली सफाई पूर्ण केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली आहे.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई ९५ टक्के झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र भाईंदर पश्चिमेच्या अमृतवानी येथील व अन्य काही नाल्यात अदाणीच्या लाईट पुरविणार्‍या उच्च दाबाच्या वाहिण्यांमुळे नाले तुंबले असून पावसाळ्यात पाणी भरण्याची दाट शक्यता आहे. मान्सूनपूर्व जर नाल्यातून केबल बाहेर काढल्यास त्याभागातील पाण्याची समस्या व घरात पाणी घुसून होणार नुकसान टळणार आहे. तसेच सदरील एकाच ठिकाणी बहुतांश केबलमुळे त्याठिकाणी पाणी व कचरा साचून राहतो व तो साफ करण्यासही अडचण होत आहे. म्हणून जोपर्यंत केबलचे जाळे हटणार नाही, तोपर्यंत पाणी तुंबण्याची शक्यता आहे,असे नागरिकांचे म्हणणे आहे.मीरा -भाईंदर शहरात पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट खाडीत वाहून जावे म्हणून नालेसफाईचे काम पालिकेने युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. तर आतापर्यंत ९५ टक्के नाल्यांची सफाई पूर्ण झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर शहरात लहान मोठे असे एकूण १७० नाले आहेत. या नाल्यांची सफाई करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून याबाबतचे कार्यादेश दीड महिन्यापूर्वीच कंत्राट दाराला देण्यात आले आहेत. यासाठी अर्थसंकल्पात तीन कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार १० एप्रिलपासून या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे १० जून पर्यंत काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पालिकेपुढे उभे राहिले होते.

त्याचीच पाहणी करण्यासाठी अमृतवानी नाला येथे अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त रवी पवार, सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी संजय दोंदे, विद्युत विभागाचे इंजिनिअर प्रशांत जानकर व स्थानिक नागरिक असिफ शेख, प्रकाश लिमये हे ही उपस्थित होते. वेळोवेळी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात वारंवार फिरून कामाची माहिती घेतली व पाहणी केल्यानेच वेळेच्या दहा दिवस आधीच ९५ टक्के नाल्यांची सफाई पूर्ण झाली असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. तर काही ठिकाणी मोकळी असलेली गटारे यांच्या तोंडावर लोखंडी जाळ्या बसविण्याचे सांगितले असून नाल्याच्या आतील अदाणीचे केबल खोदाई करून नाल्यावरून टाकण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील मोठ्या नाल्यासह अंतर्गत नाल्याची सफाई करण्यात आली आहे. तर केवळ ५ टक्केच किरकोळ जागी राहिलेली सफाई पूर्ण केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

 

नागरिकांनी पालिकेला माहिती देण्याचे आवाहन

- Advertisement -

मीरा- भाईंदर शहरात नाले सफाईचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र ज्या ठिकाणी अजूनही नाले सफाई झालेली नाही अशा ठिकाणाची माहिती नागरिकांनी पालिकेला द्यावी. जेणे करून येत्या दहा दिवसांत त्या ठिकाणी देखील नालेसफाईचे काम करता येईल, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -