घरपालघरपालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रणधुमाळी

पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रणधुमाळी

Subscribe

सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून तसेच स्थानिक आघाड्यांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीची रणधुमाळी प्रचंड गाजणार असे चित्र जिल्ह्यात समोर येत आहे.

पालघर: पालघर जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. 342 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत यासाठी तब्बल 1980 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. तर 3490 सदस्य पदांसाठी 9335 लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर शेवटच्या दोन दिवसात अर्जांचा अक्षरक्ष: पाऊस पडला असे म्हणावे लागेल. सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून तसेच स्थानिक आघाड्यांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीची रणधुमाळी प्रचंड गाजणार असे चित्र जिल्ह्यात समोर येत आहे.

जिल्ह्यात पालघर तालुक्यात सर्वाधिक 83 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून 831 सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. तर तलासरी वसई या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून तलासरी मध्ये 171 सदस्यांसाठी तर वसई 119 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. वाडा तालुक्यात 70 ग्रामपंचायतींसाठी तर 612 सदस्य यासाठी निवडणूक होत आहे त्या पाठोपाठ डहाणू येथे 62 ग्रामपंचायतीमध्ये 718 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. विक्रमगड येथे 36 ग्रामपंचायतींमध्ये 382 सदस्य संख्यांसाठी निवडणूक सुरू आहे. तर जव्हार 47 ग्रामपंचायतीमध्ये 439 सदस्य जागा आहेत. मोखाडा तालुक्यात 22 ग्रामपंचायतीसाठी 218 जागा आहेत.
पालघर तालुक्यात थेट सरपंच पदासाठी 83 जागा असून 429 लोकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. तर 831 सदस्यांसाठी 2408 लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. पालघर पाठोपाठ डहाणूमध्ये 378 लोकांनी 62 थेट सरपंच पदासाठी आपले अर्ज भरले असून 718 सदस्यांसाठी 1997 अर्ज दाखल केले आहेत. तलासरी तालुक्यात अकरा सरपंच पदांसाठी तब्बल 62 अर्ज तर 171 सदस्यांसाठी 522 अर्ज दाखल झाले आहेत, तर वसईमध्ये 11 ग्रामपंचायतींसाठी तब्बल 65 तर 119 सदस्यांसाठी 394 अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisement -

स्थानिक आघाड्यांनी कंबर कसली

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल असे चित्र आता दिसू लागले असून अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी देखील कंबर कसलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट यांच्यात महाआघाडी होते की स्थानिक आघाड्यांवरती निवडणूक लढवली जाते हे बघणे क्रमप्राप्त आहे. दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गट व भाजप यांनी पहिल्यापासून युतीत लढणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांचे उमेदवार निश्चित झालेले आहेत. तर वाडा तालुक्यात कोयलू व उज्जैन या दोन ग्रामपंचायतींमध्ये 3 सदस्य शिवसेना शिंदे गटाचे बिनविरोध निवडून आलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -