घरपालघरसीएनजी दरात ८ रुपयांची कपात, प्रवासी भाड्यात मात्र अजूनही दिलासा नाही

सीएनजी दरात ८ रुपयांची कपात, प्रवासी भाड्यात मात्र अजूनही दिलासा नाही

Subscribe

एरवी इंधनाच्या दरात वाढ होताच तातडीने भाडेवाढ करणार्‍या रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटना यांनी इंधनाचे दर कमी झाल्यामुळे प्रवासी भाडे देखील किमान ३ ते ५ रुपये कमी करावे अशी मागणी होत आहे.

बोईसर: केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी कपात केल्यानंतर आता प्रवासी भाड्यात देखील दिलासा देण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. केंद्र सरकारने ८ एप्रिलपासून सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात कपात करण्याचे आदेश दिले होते .त्यानुसार महानगर गॅस लिमिटेड आणि गुजरात गॅस लिमिटेड या खाजगी कंपन्यांनी वाहनांसाठी लागणार्‍या सीएनजी गॅसच्या दरात ८ रुपयांची मोठी कपात केली आहे.या कपातीमुळे पालघर जिल्ह्यात प्रती किलो ८६ रुपये असलेला दर आता प्रती किलो ७८ रुपयांवर आला आहे.२०२२-२३ या वर्षात सीएनजी गॅसच्या दरात जवळपास १५ रुपये घसरण झाली आहे.सीएनजी गॅसच्या दरात मोठी कपात झाली असताना सार्वजनिक प्रवासी वाहनांनी मात्र अजूनही प्रवासी भाडे कमी केलेले नाही.एरवी इंधनाच्या दरात वाढ होताच तातडीने भाडेवाढ करणार्‍या रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटना यांनी इंधनाचे दर कमी झाल्यामुळे प्रवासी भाडे देखील किमान ३ ते ५ रुपये कमी करावे अशी मागणी होत आहे.

पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात जवळपास १ हजार रिक्षा,इको,मॅजिक,डमडमसारखी प्रवासी वाहने रोज धावत असतात.बोईसर-पालघर,बोईसर-तारापूर एमआयडीसी,बोईसर-नागझरी,बोईसर-तारापूर आणि बोईसर-नवापूर/नांदगाव/मुरबे या प्रमुख मार्गांवर दैनदिन ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरांत आहे.शेअर रिक्षावाले प्रती प्रवासी किमान १५ रुपये भाडे आकारणी करीत असून बोईसर स्टेशनपासून नांदगाव,तारापूर,नागझरी या भागात जाणयासाठी प्रत्येकी ३० ते ४० रुपये भाडे वसूल केले जाते.तर तारापूर एमआयडीसी,खैरापाडा,बेटेगाव,चित्रालय,पास्थळ या जवळच्या अंतरासाठी २० ते २५ रुपये भाडे आकारणी केली बोईसरपासून पालघर, चिल्हार फाटा,मनोर,मुरबे,दांडी,तारापूर-चिंचणी,नानिवली या दूरच्या अंतरासाठी इको आणि मॅजिक चालक ३० ते ५० रुपयांपर्यंत भाडे वसूल करीत आहेत.तर मध्यरात्री १२ वाजेनंतर दीडपट भाडे घेण्याचा नियम असताना रात्री ९ वाजल्यापासूनच प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केली जाते.

- Advertisement -

बॉक्स-

शेअर रिक्षात प्रत्येकी ३ प्रवासी आणि इको,मॅजिकसारख्या वाहनात जास्तीत जास्त ७ प्रवासी बसविण्याचा नियम असताना रिक्षात ४ ते ५ प्रवासी आणि इको,मॅजिक सारख्या वाहनामध्ये ११ ते १२ प्रवासी कोंबून धोकादायक प्रवास केला जातो. प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा मनमानीपणे जास्त भाडे आकारणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून होत आहेत.सार्वजनिक प्रवासी वाहन चालकांकडून सामान्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याने अनेक प्रवाशांनी आता एस टी बसचा पर्याय स्वीकारला असून महिलांना ५० टक्के सवलत जाहीर झाल्यापासून सर्व वयोगटातील महिलांचा एस टी प्रवासाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -