घरपालघरपंचायत समिती निवडणुकीत नाट्य

पंचायत समिती निवडणुकीत नाट्य

Subscribe

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव डहाणू पोलीस स्टेशनबाहेर जमला होता.

डहाणू : डहाणू पंचायत समितीच्या 11 नोव्हेंबर 2022 रोजी होणार्‍या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांवर विरोधी पक्षातील सदस्यांची पळवापळवी आणि कुटुंबियांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पळावापळवी आणि मारहाण करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव डहाणू पोलीस स्टेशनबाहेर जमला होता.

गेली अडीच वर्षे डहाणू पंचायत समितीवर महाविकास आघाडीची सत्ता असून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्नेहलता सातवी यांचा सभापती आणि शिवसेनेचे पिंटू गहला यांचा उपसभापती पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने आज ११ नोव्हेंबरला नवीन सभापती आणि उपसभापती पदांसाठी निवडणूक पार पडणार आहे.एकूण २६ सदस्य संख्या असलेल्या डहाणू पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाली असून सदस्य फोडाफोडी जोरात सुरू होती. बहुमतासाठी १४ सदस्य लागणार असल्याने अवघे ७ सदस्य असलेल्या भाजपने सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेचे ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ असे एकूण ६ सदस्य जबरदस्तीने पळवल्याचा गंभीर आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या चळणी पंचायत समिती गणातील सदस्या अरुणा सुनील भावर यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अपहरण करून डांबून ठेवण्यात आले असून त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या आई-वडीलांना भाजपचे डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून बेदम मारहाण आणि त्यांची गाडी फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी भाजपचे भरत राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.तसेच महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे सुनील भुसारा, माकपचे विनोद निकोले तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरळी येथील आमदार सुनील शिंदे हे तिन्ही आमदार गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन डहाणू पोलीस ठाणे येथे दाखल झाले होते. उप सहाय्यक अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्या समोर ठिय्या मांडला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -