स्मशानभूमीच्या रस्त्यात अतिक्रमण! ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार

त्यामुळे संतप्त नागरिकांनी स्मशानभूमीचा रस्ता अतिक्रमणामुळे उपलब्ध नसल्याने आपला विरोध दर्शवत आज दांडा खताळी ग्रामपंचायतीच्या समोरच प्रेत जाळून आपला निषेध व्यक्त केला.

पालघर : पालघर जिल्ह्यातील दांडा खताळी गावात स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यात अतिक्रमणामुळे रस्ता उपलब्ध नसल्याने नाराज गावकर्‍यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार करून आपला निषेध व्यक्त केला. याबाबत पालघरचे तहसीलदार यांचे संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी स्पष्ट आदेश असताना ही अतिक्रमणे न काढता आदेशाला दांडा- खताळी ग्रामपंचायतीकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी स्मशानभूमीचा रस्ता अतिक्रमणामुळे उपलब्ध नसल्याने आपला विरोध दर्शवत आज दांडा खताळी ग्रामपंचायतीच्या समोरच प्रेत जाळून आपला निषेध व्यक्त केला.

पालघर तालुक्यातील दांडा – खताळी गावात बर्‍याच वर्षांपासून बारी समाज त्यांच्या स्मशानभूमीत आपल्या समाजातील मयत झालेल्या व्यक्तीचे प्रेत जाळत होता. परंतु, सदर स्मशानभूमीकडे जाणार्‍या मार्गात गावातील काही लोकांकडून अतिक्रमण करून २० गुंठे जाग्यावर कम्पाउंड करून गेट लावत त्याला कुलूप लावण्यात आले होते. याबाबत गावातील बारी समाजाच्या ग्रामस्थांकडून ग्रामपंचायीतसह, तहसीलदार पालघर यांना या शासकीय भूखंडावरील अतिक्रमण काढण्यासाठी तक्रारही करण्यात आली होती. याबाबत संबंधित अतिक्रमण निष्काषित करण्याचे पालघरचे तहसीलदार यांनी १७ ऑगस्ट २०२२ रोजी आदेश दिले होते. परंतु, गावकर्‍यांना कोणतेही सहकार्य न लाभल्याने दांडा – खताळी गावातील बारी समाजातील आशिष बारी (वय50) यांचे मयत झाल्यावर प्रेत स्मशानभूमीत नेण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामपंचायत व शासन यांचा निषेध करत ग्रामपंचायतीसमोरच आशिष बारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.