घरपालघरशहरात काजू बीची खरेदी रोख रकमेने; शासकीय उपाययोजना राबविण्याची गरज

शहरात काजू बीची खरेदी रोख रकमेने; शासकीय उपाययोजना राबविण्याची गरज

Subscribe

तालुक्यात आधुनिक शेती व तंत्रज्ञान वाढीला वेग आला असून काजू लागवड करण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. गेल्या २० वर्षात या फळाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यात कमालीची भर घातली आहे.

तालुक्यात आधुनिक शेती व तंत्रज्ञान वाढीला वेग आला असून काजू लागवड करण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. गेल्या २० वर्षात या फळाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यात कमालीची भर घातली आहे. हे खरे असले तरी, शासन स्तरावर एक तंत्रशुद्ध नियोजन करून शेतकऱ्यांना याबाबत प्रेरित केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकणार आहे. जव्हार तालुक्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून फळबाग लागवड करत आहेत. यातून वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळत आहे. परंतु काजू खरेदीबाबत शासनाची ठोस उपाययोजना नसल्याने काजू उत्पादकांना नाईलाजाने काजू बिया या शहरातील बाजारपेठेत विकल्याशिवाय पर्याय नाही. प्रति किलो १३० ते १५० रुपयांना विकणे अथवा त्या मोबदल्यात कांदे, लसूण सारख्या जीवनावश्यक वस्तू घेणे, असा व्यवहार होत आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

काजू रोप लावल्यापासून साधारणपणे ३ वर्षात उत्पादनाला सुरुवात होते. जनावरे ही रोपे खात नसली तरी त्याची मोडतोड करतात. फळे धारण झाल्यावर चोरीचे प्रमाण देखील वाढते. यावर पर्याय म्हणजे चांगल्या प्रकारे राखण करून या झाडांचे पोषण केल्यास वर्षाकाठी एक झाड २० किलोपर्यंत बियांचे उत्पन्न देऊ शकते. शिवाय हा जोड व्यवसाय हा कमी खर्चिक देखील आहे. परंतु येणाऱ्या उत्पादनाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने केवळ मोठे व्यापारी हेच आर्थिक लाभ साधत आहेत. प्रचंड पाऊस पडणाऱ्या या भागात काजू रोपे चांगल्या प्रकारे वाढत असून या भागातील माती देखील या पिकांसाठी पोषक असल्याचे शेतकरी सांगतात. परंतु येथील शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी शासन स्तरावर खरेदी केंद्र सुरू करून चांगला हमी भाव मिळावा, ही मागणी शेतकरी करत आहेत.

- Advertisement -

जव्हार, मोखाडा तालुक्यात अनेक संस्था आणि शासनाच्या योजना या काजू लागवडीवर काम करत आहेत. परंतु विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतकरी अत्यल्प किमतीत किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या मोबदल्यात काजू विक्री करत असल्याने आर्थिक उन्नतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
– तुळशीराम तराळ, काजू संकलक

मार्च महिन्यापासून काजू बिया खरेदी चालू होते. सध्या १२० ते १५० रुपये प्रति किलो बी खरेदी केली जाते. त्यानंतर जसे व्यापारी मागणी करतील. त्यानुसार विक्री केली जाते. आतापर्यंत ७० टन काजू आम्ही खरेदी केला आहे. आम्ही खरेदी केलेल्या काजू बी खरेदीसाठी नाशिक व गुजरातहून व्यापारी येत असून पुढे या बिया काजू प्रक्रियेसाठी कारखान्यात पाठवण्यात येतात. त्यावर प्रक्रिया होऊन काजू तयार होतो.
– सचिन रसाळ, काजू बी खरेदी व्यापारी

- Advertisement -

जव्हार तालुक्यात काजू पिकाचे क्षेत्र हे ६२५.५२ हेक्टर असून १५४० शेतकरी आहेत. तसेच एक झाड वर्षाला १५ ते २० किलो उत्पन्न देते. एका किलोमध्ये साधारण १४० बिया बसतात. तालुक्यातील लागवडीचे एकूण उत्पादन ६३६ मेट्रिक टन आहे. उत्पादकता १.२१ मेट्रिक टन आहे. काजू उत्पादनातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे.
– वसंत नागरे, तालुका कृषी अधिकारी, जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -