अडीच लाखांची लाच घेताना वनपाल अटकेत

रज्जाक रशिद मन्सुरी असे वनपालाचे नाव असून दानियाल हाजी खान असे त्याच्या साथिदाराचे नाव आहे.

वसई : वनविभागाच्या जमिनीवर वाढीव बांधकाम केल्याने त्याविरोधात कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची मागणी करून अडीच लाख रुपये घेताना मांडवी वन परिमंडळाच्या वनपालाला त्याच्या साथिदारासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अटक केली आहे. रज्जाक रशिद मन्सुरी असे वनपालाचे नाव असून दानियाल हाजी खान असे त्याच्या साथिदाराचे नाव आहे.

वाढीव बांधकामाविरोधात वनपालाने कारवाई न करण्यासाठी त्याचा साथिदार दानियाल खानच्या मार्फत पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपतकडे तक्रार केली होती. त्यावरून सापळा रचण्यात आला होता. बुधवारी दुपारी तक्रारदाराने दानियाल खानकडे लाचेपैकी अडीच लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खानला ताब्यात घेतले. त्यानंतर स्विकारलेली रक्कम खानमार्फत घेताना रज्जाक मन्सुरीलाही पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक अश्विनी पाटील, हवालदार पाटील, मदने, घोलप, चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.