शहीद मेजर कौस्तुभ राणे स्मारक , अमर ज्योतीचे लोकार्पण

या कार्यक्रमात हुतात्मा जवानांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांना मानवंदना देण्यासाठी सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. तर मीरा -भाईंदर महापालिकेच्या फायर ब्रिगेड व पोलीस बँडच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली.

भाईंदर :- मीरा – भाईंदर शहराचे सुपुत्र दिवंगत शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या शौर्याला सलाम करणारे शहीद स्मारक मीरा रोड येथे उभे राहिले आहे. या स्मारक व ज्योतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. आरक्षण क्रमांक 269 , कनकिया रोड , मीरारोड येथे उद्यानाच्या मधोमध हे स्मारक बनवले आहे. या स्मारकात अमर ज्योत आहे. अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष मणिंदरजीत सिंग बिट्टा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला कौस्तुभ राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे व वीर पिता प्रकाशकुमार राणे व संपूर्ण राणे कुटुंबीय उपस्थित होते. या प्रकल्पावर आमदार प्रताप सरनाईक यांच्या विशेष निधीतून 1 कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे. तर महापालिकेने 33 लाख खर्च केला असून एकूण 1 कोटी 33 लाखांचा खर्च झाला आहे. या कार्यक्रमात हुतात्मा जवानांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांना मानवंदना देण्यासाठी सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. तर मीरा -भाईंदर महापालिकेच्या फायर ब्रिगेड व पोलीस बँडच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली.

’भारत माता की जय’ , ’जय हिंद’ , ’मेजर कौस्तुभ राणे अमर रहे’ अशा उत्स्फूर्त घोषणा देशप्रेमी नागरिकांनी यावेळी दिल्या. ’जिंदा शहीद’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेले मणिंदरजीत सिंग बिट्टा यावेळी म्हणाले की , हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देईल. यावेळी वीरमाता ज्योती राणे यांनी , ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले व आपण आज ते स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्या सर्व ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य वीरांचे स्मरण आपण करावे व स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपण प्रत्येकाने योगदान द्यावे , असे आवाहन त्यांनी केले. मीरा- भाईंदर शहरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करावे अशी अपेक्षा याआधी ज्योती राणे यांनी व्यक्त केली होती. तसेच हे केंद्र सुरू झाल्यास त्यात एक शिक्षिका म्हणून आपले योगदान द्यायला आपण तयार असल्याचेही त्या म्हणाल्या. त्याची दखल घेऊन आमदार सरनाईक यांनी हे केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. यावेळी मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रास्ताविक केले. या स्मारकाची वेळोवेळी देखभाल – दुरुस्ती महापालिकेकडून केली जाईल , योग्य ती खबरदारी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी , आजी माजी लोकप्रतिनिधी , माजी नगरसेवक व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.