घरपालघरमहापालिकेचा निराधारांना आधार

महापालिकेचा निराधारांना आधार

Subscribe

या बेघर व गरीब निराधारांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, त्यांची वैयक्तिक स्वच्छता व प्रसाधनगृहे, निवासी इमारत स्वच्छ राहील, याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या व या कामासाठी प्रोत्साहित केले.

वसई : वसई- विरार महापालिकेने निराधारांना आधार कार्ड देऊन त्यांचा नागरिक म्हणून हक्क अबाधित ठेवला. आता दिवाळीत ‘बेघर निवारा केंद्रात फराळ वाटप करून महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी निराधारांची दिवाळीही गोड केली. या फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन वसईच्या वालईपाडा व नालासोपारा येथील ‘बेघर निवारा केंद्रांत करण्यात आले होते. आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांना आकर्षक विद्युत रोषणाई करून बेघर व गरीब निराधारांच्या आयुष्यातील दिवाळी आल्हाददायक व प्रकाशमय करण्यात आली. त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना आनंदित करण्याचा प्रयत्न अधिकारी व अन्य कर्मचार्‍यांच्या मार्फत करण्यात आला. या बेघर व गरीब निराधारांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, त्यांची वैयक्तिक स्वच्छता व प्रसाधनगृहे, निवासी इमारत स्वच्छ राहील, याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या व या कामासाठी प्रोत्साहित केले.

वसई-विरार महापालिकेची नालासोपारा व वसई येथे बेघरांकरता दोन निवारा केंद्रे आहेत. या निवारा केंद्रात शंभरहून अधिक निराधार स्त्री-पुरुष, मनोरुग्ण, वृद्ध व तरुणांना महापालिकेने आसरा दिलेला आहे. महापालिका नियुक्त स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या सगळ्यांची आवश्यक ती काळजी घेण्यात येते. मागील महिन्यात आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून ‘जागतिक बेघर दिनानिमित्त याठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान, प्रथमच बेघरांना आधारकार्ड देऊन नागरिक म्हणून त्यांचा हक्क अबाधित ठेवण्यात आला. त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ते औषधोपचार व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रथम महिला महापौर प्रवीणा ठाकूर यांनी जातीने उपस्थित राहून या निराधारांशी संवाद साधला होता. विशेष म्हणजे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून आणि विचारांतून वसई-विरार शहराकरता साकारत असलेल्या प्रत्येक उपक्रमाचे महापौरांनी कौतुक केले होते. त्यासाठी त्यांचे आभारही मानले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -