विरोधी पक्ष नेते दानवे यांचा दौरा ,राष्ट्रवादीचे आमदार नाराज

शिवाय, सावर्डे येथे कुपोषणाने दोन बालकांचा मृत्यू झाला होता, या ठिकाणी भेट देणे गरजेचे होते,असेही भुसारा यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली.

जव्हार: एकीकडे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पक्षसंघर्ष चालू असताना महाविकास आघाडीतही विधानसभा क्षेत्र पातळीवर सर्वकाही आलबेल नसल्याचे चिन्ह आहे. महाविकास आघाडीतील असलेला समन्वयाचा अभाव आणि नाराजी पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसत आहे.निमित्त होते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा जव्हार दौरा. दानवे यांच्या या दौर्‍याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमगडचे आमदार सुनिल भुसारा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते दानवे जव्हारला येणार असल्याबाबत मला कोणतीही कल्पना देण्यात आली नाही.विशेष म्हणजे मी महविकास आघाडीचा एक भाग आहे,परंतु या दौर्‍याबाबत मला कोणतीही माहिती नव्हती असे भुसारा यांनी म्हटले आहे. शिवाय, सावर्डे येथे कुपोषणाने दोन बालकांचा मृत्यू झाला होता, या ठिकाणी भेट देणे गरजेचे होते,असेही भुसारा यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी सकाळी ९ वाजता दानवे यांनी जव्हार तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी जव्हारच्या विश्रामगृहावर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर दानवे यांनी विठू माऊली ट्रस्टच्या कुपोषित बालकांच्या बाल संजीवनी छावणीस भेट दिली. त्यानंतर जव्हारच्या पतंगशाह कुटीर रुग्णालयाला भेट दिली व येथील आरोग्यवस्थेची माहिती घेतली. या वेळी एक राजकीय प्रश्न विचारण्यात आला. जर शिंदे गटाचा व्हीप जारी झाला तर काय होईल. या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, शिंदे गटाचा व आमचा काही एक संबंध नाही. जे त्यांच्या सोबत नाहीत त्यांना व्हीप लावण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आम्हाला कोणताही धोका नाही.

या वेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रावण खरपडे, विक्रमगड विधानसभा संघटक विजय अंभिरे, शहर प्रमुख परेश पटेल, साईनाथ नवले, उप शहर प्रमुख अरशद कोतवाल, तालुका संघटक (मुस्लिम आघाडी) मोहसीन चाबुकस्वार, शिवसेना तालुका संघटक चित्रांगण घोलप, महिला आघाडीच्या संगीता जाधव, शिवसैनिक अझर फरास आदी उपस्थित होते.

 

विधान परिषद विरोधी पक्ष नेता जव्हारला येणार असल्याबाबत मला काही कल्पना देण्यात आली नाही. मी महाविकास आघाडीचा एक भाग आहे. शिवाय, सावर्डे येथे कुपोषणाने दोन बालकांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी भेट देणे गरजेचे होते.

– सुनील भुसारा, आमदार विक्रमगड, विधानसभा