घरपालघरझोपलेल्या आरोग्यव्यवस्थेने घेतला आई - बाळाचा जीव

झोपलेल्या आरोग्यव्यवस्थेने घेतला आई – बाळाचा जीव

Subscribe

मात्र, डॉक्टरांनी या सोनालीला डहाणूतील धुंदलवाडी येथील रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले.

पालघर:  उपचार न मिळाल्याने शनिवारी डहाणू तालुक्यातील एका गर्भवतीचा तिच्या बाळासह मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घटना समोर आली आहे. सोनाली वाघात (२१) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. डहाणूतील ओसरविरा येथे राहणार्‍या सोनाली वाघात या गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी २७ मे ही तारीख देण्यात आली होती. मात्र शनिवारी तिला अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला घेऊन कासा उपजिल्हा रुग्णालय नेले. या रुग्णालयात गेल्यावर पारिचारिकेने तिला एक गोळी दिली. मात्र बर्‍याच वेळानंतरही कोणीही तिच्याकडे लक्ष देत नसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेतली. मात्र, डॉक्टरांनी या सोनालीला डहाणूतील धुंदलवाडी येथील रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू-तलासरी दरम्यान असलेल्या धुंदलवाडी रुग्णालयात हलवण्यात येत असताना, रुग्णालयात पोचण्याआधीच सोनालीचा तिच्या बाळासह रस्त्यातच मृत्यू झाल्याचे धुंदलवाडी येथील वैद्यकीय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर मृत गर्भवतीच्या कुटुंबियांनी रुग्णालय परिसरातच टाहो फोडला. सोनाली व तिच्या बाळाचा मृत्यू कासा उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाच्या निष्काळजीमुळे झाल्याचा आरोप करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी वाघात कुटुंबियांनी केली आहे. ‘माझ्या सुनेला कासा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी सिल्वासा किंवा धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. कासा येथे कुठलीही सुविधा नव्हती. त्यांनी उपचार केले नाहीत. माझ्या सुनेच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी मृत महिलेचे सासरे शिवराम वाघात यांनी केली. गर्भवती महिला रुग्णालयात आली तेव्हा बेशुध्दावस्थेत होती. तिला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, अशी माहिती डॉ. संजय बोदाडे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या रुग्णालय भेटी दरम्यान उपस्थित नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी रुग्णालयातील असुविधांविषयी तक्रारींचा पाढा वाचला आहे. जिल्हा परिषद सदस्य लतिका बालशी यांना रुग्णालयातील परिचारिका यांनी जातीवाचक भाष्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर रुग्णालयात येणार्‍या गोरगरीब रुग्णांना रुग्णालयात खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्याचबरोबर काही नागरिकांनी विविध विषयांच्या तक्रारी केल्या आहेत. याविषयी दखल घेत संबंधित परिचारिकेला समज द्यावी, अन्यथा कारवाई करा तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करा, अशी सूचना जि. प. अध्यक्ष निकम यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -