घरपालघरमहापालिकेने थकीत पाणीपट्टी असलेल्या ९० नळजोडण्या तोडल्या

महापालिकेने थकीत पाणीपट्टी असलेल्या ९० नळजोडण्या तोडल्या

Subscribe

नोटिसा देऊनही थकीत बिल भरत नसल्यामुळे जवळपास ९० नळ जोडणी खंडित केल्या आहेत.

भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये पाणीपुरवठा विभागाने थकीत असलेल्या जवळपास ९० नळजोडण्या तोडल्या आहेत. यामध्ये भाईंदर पूर्व, पश्चिम व मीरारोड रेल्वेच्या देखील काही नळजोडण्या तोडल्या आहेत. त्यामुळे थकीत पाणीपट्टी असलेल्या नागरिकांमध्ये घबराट सुरू झाली आहे. ही कारवाई आणखी सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मीरा- भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात ४१ हजार ६८३ रहिवासी तर ३ हजार २०४ व्यावसायिक नळजोडण्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाची यावर्षी ९० कोटी ७५ लाख रुपये पाणीपट्टी आहे. त्यातील आतापर्यंत ८४ कोटी २५ लाख रुपये वसुली करण्यात आली आहे. महापालिकेने १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असले तरी ही वसुली ९५ ते ९६ टक्के होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मीरा- भाईंदर शहराला एमआयडीसी व स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाणीपुरवठ्यापोटी महापालिकेला या दोन्ही प्राधिकरणाला दर महिन्याला अंदाजे ५ ते ६ कोटी रुपये रक्कम भरावी लागते. त्यामुळे पाणीपट्टी वसुली करणे आवश्यक आहे. ३१ मार्च पूर्वी सर्व थकीत पाणीपट्टी वसुली करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. ज्यांची थकीत रक्कम आहे त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा देऊनही थकीत बिल भरत नसल्यामुळे जवळपास ९० नळ जोडणी खंडित केल्या आहेत.

- Advertisement -

रेल्वेलाही दणका

रेल्वे विभागाचे ७५ लाख रुपये थकबाकी होते. भाईंदर पूर्व , भाईंदर पश्चिम व मिरारोड रेल्वे स्थानक येथे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातील काही नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. नळजोडण्या तोडताच रेल्वे अधिकार्‍यांनी महापालिकेत धाव घेत थकीत रक्कम भरण्यात येईल असे सांगण्यात आले. ज्यांच्या नळ जोडण्या तोडल्या आहेत त्यांनी थकीत रक्कम व नळजोडणी खंडीत करण्यासाठी येणारा खर्च भरल्यानंतर लगेच पुन्हा पाणीपुरवठा सुरू केला जाईल तसेच शहरातील नागरिकांसाठी २९, ३० व ३१ मार्च या सुट्टीच्या दिवशी देखील पाणी पट्टी वसुली खिडकी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा व मलनिःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -