घरराजकारणप्रशासकीय राजवटीत छत्रपतींच्या आरमार स्मारकाची कार्यवाही

प्रशासकीय राजवटीत छत्रपतींच्या आरमार स्मारकाची कार्यवाही

Subscribe

राजकीय नेते आणि सत्ताधार्‍यांना चपराक

कल्याण । कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना भाजपाने एकत्रितपणे सत्ता मिळवली होती. त्यांच्या राजवटीत किल्ले दुर्गाडी नजीक असलेल्या खाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे स्मारक निर्माण करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. असे प्रयत्न आणि कार्यवाही सुरू करण्याचे नुकतेच केडीएमसीच्या प्रशासकीय राजवटीत घोषित झाले आहे. ही सत्ताधारी आणि राजकीय नेत्यांना चपराक असल्याचे मानले जात आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेले दोन वर्ष प्रशासकीय राजवट सुरू आहे. यात प्रशासक असलेले डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी दुर्गाडी येथील स्मारक घोषित करण्यास प्रशासकीय राजवटीत प्राधान्य दिले. याविषयी भारतीय नौदल आणि कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी कंपनीमध्ये एक सामंजस्य करार देखील करून घेतलेला आहे. हे नियोजित स्मारक कल्याण डोंबिवली वासियांसाठी स्फूर्ती देणारे ठरणार आहे. याची घोषणा प्रशासकीय राजवटीत होत असल्याने ही बाब राजकीय नेते मंडळींना तसेच सत्ताधार्‍यांनाही झोंबणारी मानली जात आहे.

- Advertisement -

जय भवानी जय शिवाजी चा नारा देत 1995 पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर अडीच वर्षाचा कालावधी वगळता शिवसेना भाजपची सत्ता होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त असणारे डॉक्टर श्रीकांत सिंह यांनी आरमार स्मारक उभारण्यासंदर्भात प्रयत्न केले. तसेच याबाबत निविदा देखील काढली होती. त्यावेळी सुप्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांनी निविदादेखील भरलेली होती. स्मारक बनविण्यात हातखंडा असणारे सदाशिव साठे यांना निविदेमध्ये डावलून दुसर्‍या मूर्तिकाराची निविदा मंजूर करून घेण्यात आली होती. मात्र यानंतर आरमार स्मारकाचे भिजत पडणारे घोंगडे झाल्याने नेमके काय पुढे झाले? हे कल्याण डोंबिवलीकरांसाठी न उलगडणारे कोडे आजही आहे.

नंतरच्या कालावधीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे काळा तलाव येथे स्मारक निर्माण करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ताधार्‍यांनी ठराव पारित केला. शिवसेना-भाजपाने काळा तलावाचे रूप बदलत मुदतीच्या विक्रमी वेळेतच तो पूर्णत्वासही आणला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आरमार स्मारकाची निविदा निघूनही सत्ताधार्‍यांनी याकडे कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पाबाबत तत्कालीन पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दोन वर्षांपूर्वी संकल्पना मांडल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

दुर्गाडी किल्ले खाडीजवळ शिवरायांचे आरमार स्मारक बांधण्यासाठी नौदलाचे सेवानिवृत्त व्हाईस अ‍ॅडमिनर एस व्ही भोकरे तसेच प्रशासक डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी दुर्गाडी परिसराची पाहणी केली. या ठिकाणी भारतीय नौदलाची युद्ध नौका टी 80 विराजमान करण्याबाबत सामंजस्य करार देखील केला आहे. या ठिकाणी आरमार स्मारक उभे राहिल्यास पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना नौदलाच्या आणि शिवकालीन इतिहासाबाबत प्रामुख्याने माहिती उपलब्ध होणार आहे. आरमार स्मारक उभारण्याचे काम खरंतर सत्ताधार्‍यांनी करायला पाहिजे होते. मात्र प्रशासक म्हणून आपले कर्तव्य पार पाडीत डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांनी लक्ष केंद्रित करीत या संदर्भात करार कार्यवाही केली. त्यामुळे प्रशासकीय राजवटीची चुणूक दाखवीत सत्ताधार्‍यांना चपराक लगावल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -