घरराजकारणराष्ट्रीय भूमिकांवर शिवसेनेचे दरवाजे उघडे, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राऊतांचं विधान

राष्ट्रीय भूमिकांवर शिवसेनेचे दरवाजे उघडे, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राऊतांचं विधान

Subscribe

सहमतीचा उमेदवार असण्यापेक्षा राजकीय पक्षाला, 10 लोकांना मान्य होईल असा नाही, तर या देशाला मान्य होईल, असा ताकदीचा उमेदवार द्यायला हवा, हा राष्ट्रपती होऊ शकतो असा उमेदवार निवडणं गरजेचं आहे, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय

अयोध्याः चर्चेची दारं शिवसेनेनं कधीच बंद केलेली नाहीत. जेव्हा राष्ट्रीय विचार असतात, राष्ट्रीय मुद्दे असतात, नेतृत्वाचा प्रश्न असतो, तेव्हा शिवसेना एक राष्ट्रीय बाणाचा पक्ष आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दरवाजा बंद करून कधी बसलेले नाहीत. राष्ट्रीय भूमिकांवर त्यांनी सतत दरवाजे उघडे ठवलेले आहेत. राष्ट्रीय प्रश्नावर उद्धव ठाकरे कधीही खालच्या पातळीचं राजकारण करत नाहीत. आमची भूमिका देशाला उत्तम नेतृत्व मिळावी एवढीच असते, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. संजय राऊतांनी आज अयोध्येत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मी त्या बैठकीला हजर नव्हतो, ममता बॅनर्जींनी बैठक घेतली आणि शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. शरद पवार उपस्थित होते. तामिळनाडूतून टीआर बाळू उपस्थित होते. अनेक प्रमुख लोक नक्की उपस्थित होते. पण प्रत्येक राजकीय पक्षानं आपला प्रतिनिधी तिकडे पाठवलेला होता. आता सहमतीचा उमेदवार काय ठरवतात ते पाहायला लागेल. सहमतीचा उमेदवार असण्यापेक्षा राजकीय पक्षाला, 10 लोकांना मान्य होईल असा नाही, तर या देशाला मान्य होईल, असा ताकदीचा उमेदवार द्यायला हवा, हा राष्ट्रपती होऊ शकतो असा उमेदवार निवडणं गरजेचं आहे, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

तुम्हाला रबरस्टॅम्प खूप मिळतील, पण राष्ट्रपती हवा आहे. जसे डॉ. अब्दुल कलाम होते, प्रणवबाबू मुखर्जी होते ही राष्ट्रपती म्हणून थोर लोक होती. चर्चेची दारं शिवसेनेनं कधीच बंद केलेली नाहीत. जेव्हा राष्ट्रीय विचार असतात, राष्ट्रीय मुद्दे असतात, नेतृत्वाचा प्रश्न असतो, तेव्हा शिवसेना एक राष्ट्रीय बाण्याचा पक्ष आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दरवाजा बंद करून कधीच बसलेले नाहीत. राष्ट्रीय भूमिकांवर त्यांनी सतत दरवाजे उघडे ठेवलेले आहेत. राष्ट्रीय प्रश्नावर उद्धव ठाकरे कधीही खालच्या पातळीचं राजकारण करत नाहीत. आमची भूमिका देशाला उत्तम नेतृत्व मिळावी एवढीच असते, असंही त्यांनी सांगितलंय.

आदित्य ठाकरे आले, फार कमी वेळ ते इकडे होते. पण त्या कमी वेळामध्ये आम्ही इथे जे कार्यक्रम केले ते छाप पाडून गेले. काल संध्याकाळची महाआरती देशानं पाहिली. तो नेत्रदीपक सोहळा या परिसरात झाला नाही, असं इथले स्थानिक साधू-संत सांगत होते. कोणत्याही कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नव्हतं. शरयूच्या घाटावर जो सोहळा आपण काल अनुभवला तो अत्यंत रोमांचक होता. आध्यात्मिक आणि धार्मिक होता. अयोध्येनंतर आता महाराष्ट्रात काम करणार आहोत. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या कार्याला गती अयोध्येच्या भूमीतून मिळाली. अयोध्येतील राम जन्मभूमीच्या आंदोलनातून ऊर्जा मिळाली, मग आम्ही दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलो. या मातीचे ऋण आम्ही विसरणार नाही. महाराष्ट्राचं आणि शिवसेनेचं या भूमीशी वेगळं नातं आहे, असंही ते म्हणालेत.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंचं कौतुक करताना संजय राऊतांनी भाजपला शालजोडीतले हाणलेत. ते पोटदुखे आहेत, त्यांची सगळ्यांची आडनावं पोटदुखे ठेवली पाहिजेत. आमच्या हिंदुत्वावरती तुमच्याकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. तुम्ही काय सर्टिफिकेट देण्याची युनिव्हर्सिटी उघडलेली नाही. कोण किती हिंदुत्ववादी आहे, कोणाचं हिंदुत्व काय आहे हे तुम्ही नाही ठरवायचं. आम्ही आमचा आंतरआत्मा, आमचं कार्य, हिंदुत्वाप्रति निष्ठा असलेला आमचा संघर्ष आम्ही भूमिका बदलली नाही. आम्ही एखाद्या पक्षाची साथ सोडली असेल, 25 वर्षे त्यांच्याबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र होतो, आम्ही त्यांना सोडलं असेल पण एक तरी प्रसंग असा दाखवा आम्ही हिंदुत्व सोडलं. हिंदुत्वाला सोडून राजकीय स्वार्थासाठी, खुर्चीसाठी आम्ही राजकारण केलं, असं कधीच झालं नाही. कोण काय बोलतंय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे सर्व नकली लोक आहेत. हे काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीसोबत गेलेले चालले, तिथे कुठे यांचं हिंदुत्व गेलं होतं. ज्यांनी राम मंदिरासंदर्भात एक विचित्र भूमिका घेतली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खत्म करण्याची भाषा केली, अशा लोकांसोबत बिहारमध्ये सरकारमध्ये आहेत. भाजपनं सोयीसाठी राजकीय भूमिका बदलल्या, भाजपसारखी आम्ही कधीच भूमिका बदलली असल्याचंही त्यांनी सांगितलंय.


हेही वाचाः राष्ट्रपतीपदासाठी 11 उमेदवारांचा अर्ज दाखल, भाजपकडून सस्पेन्स कायम

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -