घरराजकारणमहिला मुख्यमंत्री : नव्या घोषणेतून उद्धव ठाकरे यांचा कोणावर निशाणा?

महिला मुख्यमंत्री : नव्या घोषणेतून उद्धव ठाकरे यांचा कोणावर निशाणा?

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्र्याचा मुद्दा काढला आणि भाजपाच्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदावर एका महिलेला संधी द्यायची आहे, असे म्हणाले. अचानक हे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी नेमके काय साध्य केले? त्यांचा निशाणा नेमका कोणावर होता? अशा चर्चांना पेव फुटले आहे.

आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228व्या जयंती कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे बोलत होते. शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहूशक्ती एकत्र आली आहे. त्यामुळे देशात मोठी ताकद आपण उभी करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असे ठाकरे म्हणाले. 2019मध्ये मुख्यंमत्रीपदावरून झालेले महाभारत अद्याप लोकांच्या विस्मृतीत गेलेले नाही. याच मुद्द्यावरून अडीच-तीन वर्षांत महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पाहिला आहे.

- Advertisement -

जूनमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. लगेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा मंत्रिमंडळ विस्तार सरकार स्थापनेनंतर 39 दिवसांनी झाला. शिंदे गट आणि भाजपाच्या प्रत्येकी 9 अशा 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यात एकही महिला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

त्यामुळे आता शिंदे गटाकडे यामिनी जाधव, लता सोनवणे, भावना गवळी या महिला लोकप्रतिनिधी आहेत. पण त्या मुख्यमंत्रीपदासाठी आश्वासक चेहरा ठरू शकत नाहीत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. तर, भाजपाच्या 105 आमदारांपैकी 12 महिला आहेत. पण तरीही मुख्यमंत्रीपदासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांची नावे घेता येतील. तथापि, ‘आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत,’ अशी भावना व्यक्त केल्यानंतर पंकजा मुंडे या राज्यातील राजकारणात बाजूलाच पडल्या आहेत.

- Advertisement -

महाविकास आघाडीचा विचार करता तुलनेत काँग्रेसचा प्रभाव कमी होत चालला आहे. काँग्रेसच्या एकूण पाच महिला आमदार आहेत. त्यात वर्षा गायकडवाड, प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर यांचा प्रभाव अधिक आहे. तरीही त्यांना या मुख्यमंत्रीपदासाठी संधी मिळू शकते का, हा प्रश्न आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्यासह तीन महिला आमदार आहेत. शिवाय, राज्यातील राजकारणात फारशा सक्रिय नसलेल्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यंत्रीपदाच्या दावेदार होऊ शकतात.

हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेते देखील ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासह मनीषा कायंदे, प्रियंका चर्तुवेदी आणि सुषमा अंधारे यांचा प्रभाव आहे. मात्र शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते, असे सांगत खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. तशाच प्रकारे महिला मुख्यमंत्री बसवणार असे सांगत, ते रश्मी ठाकरे यांना संधी देणार का, अशीही चर्चा आहे. काहीही असले तरी, कोणत्याही पक्षाने हे मनावर घेतल्यास मुख्यमंत्रीपदावर बसणारी ती पहिली महिला लोकप्रतिनिधी असेल, हे समाधानकारक असेल.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -