ट्रकची बसला धडक

चालकासह दोन प्रवासी गंभीर

 

 

 

 

 

खोपोली: मुंबई – पुणे द्रूतमार्गावर रविवारी रात्री ८.२० वाजताच्या सुमारास ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात होऊन ट्रक चालकासह बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक बस ला जाऊन धडकला आणि बस पलटी झाली असल्याची माहिती देण्यात आली. गंभीर जखमी असलेला ट्रक चालक आणि दोन प्रवाशांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बसमधील इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर लगेचच प्राथमिक उपचार करण्यात आले.
या वेळी बोर घाट वाहतूक पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत, डेल्टा फोर्स, म्हसूब जवान, मृत्युंजय देवदूत आदी यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी मदतकार्यात व्यस्त होती.खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.
अशी घडली घटना
मुंबई – पुणे द्रूतमार्गावर ट्रक (एमचए४०/बीजी ३४५७) वरील चालक नावेद खान (नागपूर) हा पुणे बाजूकडून मुंबईकडे जात असताना ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने सदर ट्रक हा मुंबई लेनवरून पुणे लेनवर गेला आणि त्या मार्गावरुन जाणार्‍या बस (केए४१/१४७१)च्या उजव्या बाजू कडील भागावर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. धडक एवढी गंभीर होती की बसची एक बाजू संपूर्णतः डॅमेज झाली आहे. बस चालकाने बस शोल्डर लेनला घेतल्यामुळे मोठी हानी झाली नाही.सदर अपघातामध्ये ट्रक चालक खान आणि बसमधील दोन प्रवासी यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना आयआरबीच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये नेले आहे.