घररायगडकर्जत तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचा भार ४० ग्रामसेवकांवर, कार्यालयातील कामात होतेय दिरंगाई

कर्जत तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचा भार ४० ग्रामसेवकांवर, कार्यालयातील कामात होतेय दिरंगाई

Subscribe

नेरळ सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार देखील प्रभारी ग्रामसेवक सांभाळत आहेत. त्यात शासकीय बैठका, प्रशिक्षण, इतर कामे आदींमुळे ग्रामपंचायतींचा कारभार हाकताना ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. तर या अतिरिक्त कामाने आठवड्यातील वार ग्रामसेवकांचे देण्यात आलेले आहेत. या वारांसाठी डोळे लावून बसण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

गावाचा विकास आणि समृद्धीचा मार्ग हा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून जात असतो. अनेक विकासकामांना येथून मंजुरी मिळत, गाव सुजलाम सुफलाम होतो. यासाठी गावाच्या स्थानिक बॉडीसह येथील ग्रामसेवक शासनाचा सदस्य म्हणून आपली भूमिका पार पाडत असतात. मात्र, ग्रामसेवकांवर अतिरिक्त भार पडल्यास त्याचा परिणाम गावच्या विकासावर होतो.

कर्जत तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचा भार हा ४० ग्रामसेवकांवर येऊन पडला आहे. त्यात अनेक रिक्त पदांचा फटका ग्रामपंचायतींना बसत असून कामात दिरंगाई होत आहे. तर ग्रामसेवकांच्या मागण्या देखील शासनाकडून प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन ग्रामसेवक भरती होणार केव्हा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एक हजारच्या आतील लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक तर दीड हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. कर्जत तालुक्यात ५४ ग्रामपंचायती आहेत. तर जिल्ह्यात लोकसंख्या व आर्थिक दृष्टीने सर्वात मोठी असलेली नेरळ ग्रामपंचायत कर्जत तालुक्यातच आहे. कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून देखील ओळखला जातो.

- Advertisement -

गावाच्या समृद्धीचा मार्ग असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना अतिरिक्त भार दिल्या गेल्याने विकासाला खीळ बसल्याचे चित्र आहे. तालुक्यात ५४ ग्रामपंचायत पैकी २३ ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक कार्यरत आहेत. तर १७ ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. तालुक्यात २८ ग्रामसेवक व २१ ग्रामविकास अधिकार यांच्या जागा मंजूर आहेत. मात्र त्यात ६ जागा रिक्त असून एक ग्रामसेवक निलंबित करण्यात आले असून दोघे अनधिकृत रजेवर आहेत. तर १५ ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्यावर अतिरिक्त भार टाकला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका ग्रामसेवकांवर २ ते ३ ग्रामपंचायतीचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. नेरळ सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार देखील प्रभारी ग्रामसेवक सांभाळत आहेत. त्यात शासकीय बैठका, प्रशिक्षण, इतर कामे आदींमुळे ग्रामपंचायतींचा कारभार हाकताना ग्रामसेवकांची दमछाक होत आहे. तर या अतिरिक्त कामाने आठवड्यातील वार ग्रामसेवकांचे देण्यात आलेले आहेत. या वारांसाठी डोळे लावून बसण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. यातून अगदी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा मुख्यालयी ग्रामसेवक सापडत नाहीत. तेव्हा चुकी नसताना देखील ग्रामस्थांच्या रोषाला ग्रामसेवकाना सामोरे जाण्याची वेळ ग्रामसेवकांवर आली आहे.

- Advertisement -

एका ग्रामपंचायतीला एक वार असेल तर त्या ग्रामसेवकाला दुसर्‍या ग्रामपंचायतीचे काम होत नाही. आणि दुसरीकडे गेल्यावर इकडची काम राहतात. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती ग्रामसेवकांची आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढतात आणि त्या पंचायत समितीपर्यंत जातात. मात्र ग्रामसेवक उपलब्ध होत नाहीत. त्यात आठवड्यातून किंवा पंधरवाड्यातून एक व्हीसी असते. त्यामुळे काम करणे अवघड होते. त्यातून गावाचा विकास कसा साधायचा हा प्रश्न असल्याने ग्रामसेवकांची मोठी तारेवरची कसरत होत असते.

जिल्ह्यातील रिक्त पदे शासनाकडून भरली गेली पाहिजेत. यासाठी संघटनेकडून शासनाकडे मागणी केलेली आहे. यासह ग्रामसेवकांची शैक्षणिक अर्हता कमीत कमी पदवी किंवा तांत्रिक पदवी अशी असावी. ग्रामपंचायतीच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या ही कमी आहे. त्यामुळे ती वाढवली गेली पाहिजे. यासोबत विस्तार अधिकारी यांची पदसंख्या वाढवली गेली पाहिजे. म्हणजे ग्रामपंचायतींच्या तुलनेत विस्तार अधिकार्‍यांची संख्या देखील कमी आहे. १० ग्रामपंचायतींच्या मागे १ विस्तार अधिकारी असला पाहिजे. अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने केलेली असून त्यावर आम्ही ठाम आहोत
– प्रवीण पेमारे, अध्यक्ष, कर्जत तालुका ग्रामसेवक संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -