प्रचंड थंडीमुळे समुद्र किनार्‍यावर ४०० मच्छिमार नौका परतल्या

मासळीच्या ओल्या दुष्काळामुळे गेल्या गेल्या १५ दिवसांपासून मच्चीमारांवर नामुष्की ओढवली असून मच्चीमार तणावग्रस्त झाल्याची माहिती एकदरा येथील हनुमान सह. मच्चीमार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी दिली.

अति बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे आणि अवकाळी वादळी पावसाने समुद्र किनारपट्टीवर प्रचंड गारठा पडला आहे. रात्री १२ ते सकाळी ५वाजेपर्यंत थंडीचा पारा १५ ते १० सेल्सिअस इतका खाली येत असून मानवी प्रकृतीस सहन करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

या अतिथंडीचा परिणाम समुद्रातील मासळीवर देखील झाला असून मासळी मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. यामुळे समुद्रात गेलेल्या अलिबाग तालुक्यासहित मुरूड, एकदरा, राजपुरी, दिघी, नांदगाव या गावच्या ४०० मासेमारी नौका किनार्‍यावर परतल्या आहेत. मासळीच्या ओल्या दुष्काळामुळे गेल्या गेल्या १५ दिवसांपासून मच्चीमारांवर नामुष्की ओढवली असून मच्चीमार तणावग्रस्त झाल्याची माहिती एकदरा येथील हनुमान सह. मच्चीमार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी दिली.

नौका मालक कैलास निशानदार यांनी सांगितले की, समुद्रावरून अति थंड वारे वाहत असल्याने पाण्याला देखील मोठा थंडावा आला आहे. त्यामुळे मासळी देखील खोल पाण्यात तळाशी गेली आहे. समुद्रात पाणी अति थंड झाले की असेच होत असते. त्याचाच फटका मासळी मिळत नसल्याने शेकडो मच्छिमारांना बसला आहे. त्यामुळे मच्छिमारीच्या ऐन सिझनमध्ये मासेमारी अर्धवट सोडून आणि मोठे नुकसान सहन करीत आम्हाला किनार्‍यावर परतावे लागल्याचे कैलास निशानदार यांनी सांगितले.

सध्या कुपा, सुरमई आदी मासळी मिळत होती. परंतू आता सर्वच बंद पडले आहे. थोडी फार टायनी लाल कोलंबी मुरूड मार्केटमध्ये दिसून येत असते. ६ सिलेंडर्सवाली मोठी नौका सुमारे ५०० लिटर्स डिझेल, बर्फ, खाद्य साहित्य आदी ७० ते ८० हजार रुपये खर्चून मासेमारीस जात असते. अशा सुमारे अशा शेकडो नौका नुकसान सोसून अखेर किनार्‍यावर परतल्याचे शुक्रवारी दिसून आले. आता समुद्रात सन्नाटा दिसून येत आहे. विविध गावच्या किनार्‍यावर या नौका नांगरण्यात आल्या आहेत. समुद्रात पाण्याला अति थंडावा येतो त्यावेळेस मासळी किनार्‍या ासून खूप खोल समुद्रात ऊब मिळविण्यासाठी जात असते. अशा वेळी मासळीचा प्रवास ५० किंवा १०० वाव असू शकतो. पाकिस्तान बॉर्डरपर्यंत मोठी मासळी स्थलांतर करू शकते. त्यामुळे मासळी मिळणे अवघड असते असे रायगड जिल्हा मच्छिमार कृती संघाचे अध्यक्ष मनोहर बैल यांनी सांगितले.