घररायगडरस्ता सुरक्षेकडे महामार्ग बांधकाम विभागाचेच दुर्लक्ष; महाड पोलीस प्रशासनही अनभिज्ञ

रस्ता सुरक्षेकडे महामार्ग बांधकाम विभागाचेच दुर्लक्ष; महाड पोलीस प्रशासनही अनभिज्ञ

Subscribe

तालुक्यातून जाणार्‍या रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे सद्या सुरू आहेत. मात्र या रस्त्यावरून ये - जा करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतीच उपाययोजना संबंधित ठेकेदाराकडून होत नसल्याने अनेक अपघात होत आहेत. एकीकडे रस्ता सुरक्षेकडे शासनाचे परिवहन विभाग भर देत असतानाच महामार्ग बांधकाम विभागाचे मात्र रस्ता सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

महाड: तालुक्यातून जाणार्‍या रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे सद्या सुरू आहेत. मात्र या रस्त्यावरून ये – जा करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतीच उपाययोजना संबंधित ठेकेदाराकडून होत नसल्याने अनेक अपघात होत आहेत. एकीकडे रस्ता सुरक्षेकडे शासनाचे परिवहन विभाग भर देत असतानाच महामार्ग बांधकाम विभागाचे मात्र रस्ता सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातून जाणारा महाड – रायगड मार्ग, म्हाप्रळ – पंढरपूर, मुंबई गोवा महामार्ग आदी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र ही रस्त्यांची कामे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत. रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. सद्या सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर चौदरीकरणानंतर अनेक अपघात झाले आहेत. या अपघातातून शेकडो लोकांचे बळी देखील गेले. चुकीच्या पद्धतीने केलेली बाह्य वळणे, खोदलेले चर, मातीचे ढीग यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दगावल्याच्या घटना वाढल्या आहेत. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्यांच्या पूर्णत्वासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने रस्त्याच्या कामाला विलंब लागत आहे. ऐन पावसाळ्यात देखील रस्त्याच्या कामामुळे हा रस्ता धोकादायक बनून अपघात झाले आहेत. अशाच पद्धतीने महाड – रायगड मार्गाचे देखील काम सुरू झाले आहे. या रस्त्याचे देखील रुंदीकरण केले जात आहे. महाड नातेखिंड येथून किल्ले रायगडापर्यंत रुंदीकरण केले जात आहे. ज्या ठेकेदाराने सुरवातीला हे काम घेतले अनेक चुका आणि विलंब झाल्याने नव्याने अन्य ठेकेदाराला हे काम देण्यात आले. या ठेकेदाराने देखील काम पूर्ण करण्याच्या इर्षेने संपूर्ण मार्ग खोडून टाकला. यामुळे रस्त्यार प्रचंड धूळ तयार झाली आहे. या धुळीने दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच टप्प्या टप्प्यात केल्या जाणार्‍या कामामुळे अनेक अपघात देखील झाले आहेत. संबंधित ठेकेदाराच्या अवजड वाहनांकडून रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
महाड रायगड मार्गाच्या सुरक्षेबाबत स्थानिक नागरिकांची तक्रार असतानाच महाड महाप्रळ पंढरपूर मार्गावर देखील वराठी पासून थेट महाड पर्यंत खोदकाम केले आहे. जागोजागी खड्डे, मातीचे ढीग, बाह्यवळण, रस्त्यात पडलेली खडी यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. गेली कांही महिन्यात प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा, माल वाहतूक करणार्‍या गाड्या रस्त्याकडेला घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत या परिसरातील राजकीय नेतृत्व असलेले रिहान भाई देशमुख यांनी आवाज उठवला होता. स्थानिक महामार्ग बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा केली मात्र कांही दिवसातच पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण केली आहे. ज्या स्थानिक नागरिकांना महाड शहरात बाजाराला, नोकरीनिमित्त महाड औद्योगिक क्षेत्रात, आणि सरकारी कर्मचार्यांना दुचाकीवर, सहा आसनी रिक्षाने यावे लागते त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अंगात घातलेला शर्ट महाड मध्ये येवून बदलावा लागतो अशी स्थिती निर्माण झाल्याचे या परिसरातील एका प्रवाशाने सांगितले.

चालकाचे लक्ष विचलित होवून अपघाताची शक्यता
मुंबई गोवा महामार्गाचे काम देखील आजही अनेक ठिकाणी रेंगाळलेले आहे. या ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे अपघात होत आहेत. रात्रीच्या सुमारास रस्त्याकडेला असलेल्या सुरक्षा कठड्यावर रेडियम लावलेले नाही यामुळे बाह्यवळण दिसून येत नसल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर सावित्री पुलावर असलेले जोड निघून गेल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती, यातून निघालेला लोखंडी रोड एखाद्या वाहनात अडकून अपघाताची दाट शक्यता होती मात्र माध्यमांनी ही बाब समोर आणल्यानंतर याची दुरुस्ती करण्यात आली. ज्याठिकाणी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी दुभाजकाला आणि शेजारी असलेल्या लोखंडी सरंक्षक कठड्यांना हॉटेल मालकांनी आणि इतर व्यवसायिकांनी विनापरवाना फलक लावले आहेत. या फलकांमुळे चालकाचे लक्ष विचलित होवून अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र या किरकोळ वाटणार्‍या मोठ्या चुकांकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष आहे.

- Advertisement -

ओव्हरलोड कोळसा वाहतुकीवर तोंडावर बोट
महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे देखील काम सुरु झाले आहे. याठिकाणी देखील सुरक्षेचे तीनतेरा वाजवले जात आहेत. रस्त्यात मोर्‍यांची कामे सुरु असल्याने रात्रीच्या सुमारास वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत. मातीची धूळ मोठ्या प्रमाणावर उडत आहे. याबाबत एम.आय.डी.सी.कडून देखील दुर्लक्ष होत आहे. यातून देखील छोटे मोठे अपघात होत आहेत. याच औद्योगिक क्षेत्रातून वाहतूक होत असलेल्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीकडे देखील पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. कोळशाच्या अवजड वाहनांमुळे अनेक अपघात होवून देखील या ओव्हरलोड वाहतुकीबाबत पोलीस आणि परिवहन विभागाचे तोंडावर बोट असल्याने कोळसा वाहतूक करणारे ठेकेदार आणि प्रशासन यातील संबंधाची कल्पना येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -