घररायगडकाळरूपी भरधाव ट्रकने चौघांना चिरडले; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघेजण

काळरूपी भरधाव ट्रकने चौघांना चिरडले; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघेजण

Subscribe

काळ बनून आलेल्या भरधाव ट्रकने साळाव-रोहे मार्गावर वाटेत आलेल्या ८ जणांना ठोकरले असून, त्यातील चौघांचा मृत्यू झाला, तर इतर ४ जण जखमी झाले आहेत.

काळ बनून आलेल्या भरधाव ट्रकने साळाव-रोहे मार्गावर वाटेत आलेल्या ८ जणांना ठोकरले असून, त्यातील चौघांचा मृत्यू झाला, तर इतर ४ जण जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी उशिरा अंगावर शहारे आणणारा हा प्रकार घडला. ट्रकचा चालक भांग वा तत्सम अंमली पदार्थाच्या नशेत असल्याची माहिती समोर आली असून, त्याला जमावाकडून बेदम चोप देण्यात आला. मुरुड तालुक्यातील साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीतून रोहे मार्गाने हा ट्रक (एमएच 04 ईवाय 8501) वडखळकडे निघाला होता. मात्र नशेच्या धुंदीत असणार्‍या चालकाने सुरुवातीपासूनच बेदरकारपणे वाहन हाकण्यास सुरुवात केल्यामुळे चणेरेपर्यंत त्याने ८ जणांना उडवले. सुरुवातीला साळावनजीक बिर्ला मंदिराजवळ एका महिलेला, आमली येथे एकाला आणि चेहेर येथे दोघांना ठोकर बसल्याने ते जखमी झाले. त्यानंतर चालकाने न थांबता वाहनाचा वेग आणखी वाढवला. पुढील गावात याची माहिती मिळताच स्थानिकांनी हा ट्रक अडविण्यासाठी प्रयत्न केला असता वाटेतील वाहने आणि अडथळे उडवून लावत तो पुढे गेला.

न्हावे फाट्यानजीक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले आणि शिवजयंती साजरी करून पत्नी, मुलासह कामानिमित्त बाहेर निघालेले लक्ष्मण बाबू ढेबे (45) यांच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यामध्ये ढेबे आणि मुलगा रोहित (१२) जागीच गतप्राण झाले, तर पत्नी रामेश्वरी (३८) यांच्या दोन्ही पायावर ट्रकचे चाक गेल्याने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचेही निधन झाले. ढेबे यांची दुचाकी ट्रकने किमान 400 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेली. त्यानंतर या ट्रकने चणेरे येथील वृद्ध नागरिक उदय वाकडे यांना ठोकरल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

परंतु तरीही न थांबलेल्या या ट्रकला अखेर चांडगाव परिसरात सुरू असलेल्या शिवजयंती उत्सवात काही विपरित घडू नये म्हणून तरुणांनी धाडस दाखवून अडवले आणि चालकाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. या भीषण घटनेनंतर वातावरण कमालीचे संतप्त झाले. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी, राज्य बेलदार समाजाचे राज्याध्यक्ष राजू साळुंके, भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांच्यासह रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे पोलीस फाट्यासह काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून, अधिक चौकशी उप विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम करीत आहेत.

काळ बनलेला हा ट्रक बाहेर पडण्यापूर्वी तपासणी करून कंपनीच्या प्रवेशद्वारावरच अडविण्यात आला असता तर पुढे अनर्थ घडला नसता, असे मत अनेकांनी व्यक्त केले. या घटनेनंतर रात्रभर जेएसडब्ल्यू कंपनीतून माल वाहतूक करणारे ट्रक जागा मिळेल तेथे उभे करण्यात आले होते. कंपनीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काटा प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार आणि वसाहतीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

नुकसान भरपाईच्या मुद्यावर रेवदंडा पोलीस ठाण्यात पहाटे सव्वातीन वाजेपर्यंत बैठक चालली. यामध्ये मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 11 लाख रुपये देण्याचे कंपनीने मान्य केले. तसेच शिक्षक लक्ष्मण ढेबे यांच्या मुलींच्या भविष्यातील शिक्षणाची जबाबदारी कंपनीने स्वीकारली. ही रक्कम तीन दिवसांत देण्याची मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, लोकप्रतिनिधी, कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा –

Pune Lockdown – काय राहणार चालू? काय राहणार बंद?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -