घरक्रीडाकपिल देव पुन्हा भारताकडून खेळणार!

कपिल देव पुन्हा भारताकडून खेळणार!

Subscribe

भारताला ३५ वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये सर्वात पहिला विश्वचषक जिंकवून देणारे भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी १९८३ साली भारताला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला आणि क्रीडाविश्वात भारताची वेगळी ओळख निर्माण केली. हेच कपिल देव पुन्हा एकदा वयाच्या ५९ व्या वर्षी भारताचे आतंरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहेत. २४ वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले कपिल देव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळणार आहेत खरे, पण क्रिकेट संघातून नाही तर भारतीय गोल्फ संघातून! कपिल देव हे ‘२०१८ आशिया पॅसिफिक सीनिअर्स’ या स्पर्धेत भारतीय गोल्फ संघातून खेळणार आहेत.

क्रिकेटनंतर आता गोल्फ मैदान

कपिल देव यांनी नोएडा येथे जुलैमध्ये पार पडलेल्या ऑल इंडिया सीनिअर टूर्नामेंटमध्ये केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्यांची भारतीय गोल्फ संघात निवड झाली आहे. आशिया पॅसिफिक सीनिअर्स या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी कपिल देव हे आपला खेळ सुधरवण्यासाठी ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘लुईस फिलिप कप’ या स्पर्धेत भाग घेत आहेत. यावेळी कपिल देव यांनी सांगितले की, “मला गोल्फ खेळात इतकी चांगली संधी मिळाली असल्याने मी खूप आनंदी आहे आणि भारतीय गोल्फ संघाचा खेळ उंचावण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन”.

- Advertisement -

गोल्फ संघात भारतीय माजी क्रिकेटर्सची फौज

२०१८ आशिया पॅसिफिक सीनिअर्स या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय गोल्फ संघातून कपिल देव यांच्या सोबतच भारताचे माजी क्रिकेटपटू सैयद किरमाणी, मुरली कार्तिक, अजित आगरकर, वेंकटपती राजू आणि सुजीत सोमसुंदर हे देखील असणार आहेत. क्रिकेटपटूंसोबतच भारताच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार आणि गोलकीपर आशीष बल्लाळही संघात असणार आहेत. या सर्व खेळाडूंसोबतच प्रसिद्ध क्रिकेट समालोचक चारू शर्माही या संघात खेळताना दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -