Asian Boxing Championship : भारताच्या अमित पांघलची अंतिम फेरीत धडक

उपांत्य फेरीतील सामन्यात अमितने कझाकस्तानच्या सकेन बिबोसीनोव्हचा पराभव केला.

amit panghal enters final
अमित पांघलची अंतिम फेरीत धडक

भारताचा स्टार बॉक्सर आणि गतविजेत्या अमित पांघलने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ५२ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात अमितने कझाकस्तानच्या सकेन बिबोसीनोव्हचा पराभव केला. या लढतीत अमितने सुरुवातीला सावध खेळ केला. परंतु, त्यानंतर त्याने प्रतिहल्ला करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. बिबोसीनोव्हला फारसा चांगला बचाव करता आला नाही आणि याचा फायदा घेत अमितने हा सामना ५-० असा जिंकला. बिबोसीनोव्हने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते आणि त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही अमितनेच त्याचा पराभव केला होता.

लढत ५-० अशी जिंकली

शुक्रवारी झालेल्या लढतीत तिसऱ्या सीडेड बिबोसीनोव्हने आक्रमक खेळ करत अव्वल सीडेड अमितला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमितने सावध खेळ केला. त्याचा भक्कम बचाव बिबोसीनोव्हला भेदता आला नाही. या लढतीच्या अखेरच्या फेरीत बिबोसीनोव्ह दमलेला दिसला. याचा अमितने फायदा घेत ही लढत ५-० अशी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

चार महिला बॉक्सर्स अंतिम फेरीत

त्याआधी गुरुवारी भारताच्या चार महिला बॉक्सर्सना अंतिम फेरी गाठण्यात यश आले होते. यात सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरी कोम (५१ किलो वजनी गट), लालबुतसाईही (६४ किलो), पूजा राणी (७५ किलो) आणि अनुपमा (८१ किलोवरील) यांचा समावेश होता. साक्षी चौधरीला (५४ किलो) मात्र पराभव स्वीकारावा लागला. साक्षीला या लढतीची विजेती घोषित करण्यात आले होते. परंतु, तिची प्रतिस्पर्धी अव्वल सीडेड कझाकस्तानच्या डिना झोलामनने या निर्णयाला यशस्वीरीत्या चॅलेंज करत हा सामना जिंकला.