Asian Champions Trophy : भारताची पाकिस्तानवर मात

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ३-१ असा पराभव केला.

भारताची पाकिस्तानवर मात (सौ-Flipboard)

कर्णधार मनप्रीत सिंग, मनदीप सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी मारलेल्या गोलमुळे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ३-१ असा पराभव केला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. भारताचा यापुढील सामना जपानशी होणार आहे.

असा झाला सामना 

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या सामन्यात पाकिस्तानने अप्रतिम सुरूवात केली. त्यांनी पहिल्याच मिनिटाला गोल केला. त्यांच्यासाठी मुहम्मद इरफान ज्युनियर याने हा गोल केला. यानंतर पाकिस्तानला गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या. पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. २४ व्या मिनिटाला अक्षदीप सिंगला गोल करण्याची संधी होती. पण तो गोल करू शकला नाही. पण यानंतर भारताने अधिक आक्रमकपणे खेळण्यास सुरूवात केली. कर्णधार मनप्रीत सिंगने गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर ३३ व्या मिनिटाला मनदीप सिंगने अप्रतिम गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर ४२ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल करत भारताची आघाडी ३-१ अशी वाढवली.

श्रीजेशचा २०० वा सामना 

भारताचा गोलकिपर पी.आर.श्रीजेशचा हा भारतासाठी २०० वा सामना होता. श्रीजेश जगातील सर्वोत्तम गोलकिपरपैकी एक आहे. त्याने २ चॅम्पियन्स ट्रॉफी, २ एशियन गेम्स आणि १ हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.