कॅरेबियन जलवा

West indies

कॅरेबियन्सची अनपेक्षित अन् धडाकेबाज कामगिरी पाहता क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही यावर विश्वास बसतो. चॅम्पियन्स ट्रॉफी असो, विश्वचषक असो अथवा आयपीएल असो… आजवर कॅरेबियन्सचा जलवा सर्वांना थकीत करणाराच राहीला आहे. यंदाच्या विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात विंडीजने पाकचा धुराळा उडवला आणि ‘सावध ऐका पुढल्या हाका’ म्हणत यंदाच्या विश्वचषकात आपली दावेदारी सिद्ध केली. टी-२० विश्वचषक, अंडर-१९ विश्वचषक आणि महिला विश्वचषक एकाच वर्षी पटकावत विंडीजने याआधी आपली पात्रता दाखवून दिली आहे. एवढेच नव्हे, तर अनेक सामन्यांत विक्रमी, तुफानी खेळी करत प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चित केले आहे. ‘आयपीएल’मध्येही आंद्रे रसेल, क्रिस गेल, कार्लोस ब्रेथवेट, शिमरॉन हेटमायर यांनी केलेल्या तुफानी खेळी अविस्मरणीय आहेत. ही ’कॅरेबियन पॉवर’ कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवते.

२०१६ मध्ये पुरुष व महिलांच्या कॅरेबियन संघांसह १९ वर्षाखालील विंडीज संघानेही जेतेपद पटकावत सार्या जगाचेच लक्ष वेधले. पुरुष टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद तर प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात राहील असेच होते. अशक्य वाटणारा विजय शक्य करून साहेबांनाच चारीमुंड्या चित करत विंडीजने सर्वांनाच धक्का दिला होता. अर्थात अशी कामगिरी करण्याची विंडीजची ही पहिली वेळ नव्हती. निम्म्याहून अधिक कॅरेबियन खेळाडूंमध्ये कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची आणि कुठल्याही गोलंदाजासमोर फटकेबाजी क्षमता आहे. प्रचंड ताकद आणि कुठल्याही दडपणात नसलेले हे फलंदाज भल्याभल्या गोलंदाजांचे चेंडू मैदानाबाहेर भिरकावण्याची ताकद ठेवतात आणि कितीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची ‘विलपॉवर’ ते ठेवतात, त्यामुळेच त्यांच्या कामगिरीचा आलेखही चढाच आहे. काही अंतर्गत वादांमुळे काहीशा पिछाडीवर गेलेल्या या कॅरेबियन संघाने सर्वच देशांतील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत, हे मात्र तितकेच खरे.

लागोपाठ चार षटकार मारून संघाला टी-२० विश्वचषकाचा किताब पटकावून देणारा कार्लोस ब्रेथवेट सामन्यानंतर म्हणाला, ‘मला फक्त आलेला चेंडू सीमापार पाठवायचा होता. किती धावा लागत आहेत याचा मी विचार केला नाही. उलट आणखी धावांची गरज असती तर पुन्हा एखादा षटकार लगावला असता.’ त्याच्या या विधानावरून कॅरेबियन्सची ताकद अन् विचार करण्याची पद्धत अधोरेखित होते. ‘कॅन डू’चा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणार्या या कॅरेबियन्स कितीही मोठे लक्ष्य गाठण्याची क्षमता ठेवतात. क्रिस गेल, रसेल यांनीही आयपीएलसह अन्य आंतरराष्ट्रीय सामन्यांत केलेली तुफानी खेळी प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरवते. केवळ फलंदाजीच नव्हे, तर गोलंदाजांतही विंडीजची दहशत आजही कायम आहे. वेगवान मारा, शरीराचा वेध घेणारे-उसळते चेंडू, स्विंगचा मारा करणारे जलद गोलंदाज आजही दिग्गजांच्या दांड्या गुल करतात. पाकिस्तानच्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारत विंडीजने आपला विजयरथ मार्गस्थ केला आहे. आता पुढील सामन्यांतही कॅरेबियन्सचा दरारा निश्चितच उत्कंठा वाढवणारा ठरणार आहे, यात शंका नाही.