घरक्रीडाबॅट आमची, चेंडू तुमचा

बॅट आमची, चेंडू तुमचा

Subscribe

रविवारच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील भारत – पाकिस्तान या वर्ल्डकपमधील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील लढतीचे सार्‍यांना वेध लागले आहेत. इंग्लंडमधील पावसाळी वातावरण, कुंद हवा, तेज खेळपट्ट्या या सार्‍या बाबी लक्षात घेता मँचेस्टरच्या सामन्यात टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षणास पसंती देईल असे वाटते. दुखापतग्रस्त डावखुरा सलामीवीर शिखर धवनची उणीव भारताला नक्कीच जाणवेल. सूर गवसलेला शतकवीर गमावणे क्लेशदायकच. हाताचा अंगठा दुखावल्यामुळे धवन किमान दहा-बारा दिवस विश्रांती घेईल, त्यामुळे लोकेश राहुलला सलामीला बढती मिळेल.

ओल्ड ट्रॅफर्डवरील वातावरण स्विंग गोलंदाजीला अनुकुल असल्यामुळे अष्टपैलू विजय शंकरच्या समावेशाची दाट शक्यता वाटते. मोहम्मद अमीर, वहाब रियाझ, इमाद वसीम या त्रिकुटावर पाकची भिस्त असेल. भारताकडेही जसप्रीत बुमरासारखा तेजतर्रार गोलंदाज असून, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी या तेज त्रिकुटाकडेही धारदार, भेदक मारा करण्याची क्षमता आहे.भारत, पाक यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे रसिकांना पर्वणीच. सार्‍या देशात चैतन्याची लहर येईल. भरीस भर म्हणून रविवार असल्यामुळे दुपारच्या जेवणानंतर टीव्हीवर भारत-पाक लढतीचा आस्वाद कोट्यवधी चाहते घेतील. ट्रेंट ब्रिजवरील भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा विरस झाला. ओल्ड ट्रॅफर्डवर पावसाने व्यत्यय आणू नये अशीच तमाम चाहत्यांची अपेक्षा असेल.

- Advertisement -

वर्ल्डकप स्पर्धेत पाकविरुध्द नेहमीच भारताचे वर्चस्व राहिले आहे. ऑस्ट्रेलिया, भारत (बंगळुरू), इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत (मोहाली), ऑस्ट्रेलिया येथील लढतीत भारताने सरशी साधताना ‘डबल हॅटट्रिक’ ची किमया केली. वर्ल्डकप टी-२० स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला एकदा नव्हे तर दोनदा हरवून पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये जेतेपदाला गवसणी घातली. १९९२-२०१५ या दरम्यानच्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या मक्तेदारीला पाकला शह देता आलेला नाही.

रोहित शर्मा, विराट कोहली-महेंद्रसिंग धोनी या आजी-माजी कर्णधारांची जोडी ही भारतीय संघाच्या फलंदाजांची फळी प्रतिस्पर्धांसाठी डोकेदुखी ठरू शकते. या कर्तबगार त्रिकुटाची कामगिरी वाखाणण्याजोगीच. जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा विलक्षणच. धावांच्या राशी तसेच शतके रचण्यात तिघेही माहीर. चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाबाबत बरीच चर्चा झाली, वाद-विवाद रंगले, परंतु हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुध्द झंझावाती खेळ करून आपली छाप पाडली. धवनच्या दुखापतीमुळे राहुलला सलामीला बढती मिळाल्यावर पाकविरुध्दच्या लढतीत कोहली चौथ्या क्रमांकावर कोणाला पाठवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

- Advertisement -

सर्फराज अहमदच्या पाकिस्तानी संघात इमाम-उल-हक, फकर झमान, बाबर आझम, आसिफ अली यांच्यासह मोहम्मद हफीझ, शोएब मलिक या माजी कर्णधारांचा समावेश आहे. इंग्लंडविरुध्द पाक फलंदाजांनी ३५० धावांचा टप्पा गाठला, परंतु विंडीजने सलामीच्या लढतीत पाकला सहज नमवले. गतवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुध्द पाकची मधली फळी कोसळली. फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजी हेच पाकचे बलस्थान. अमीर, वहाब रियाझ, इमाद वसीम, हसन अली, शादाब खान असे घातक गोलंदाज सर्फराजच्या हाताशी असून, भारताविरुध्द ते काय पराक्रम करतात हे पहावे लागेल.

पाकिस्तानला क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारण करावी लागेल. रोहित, विराट, धोनीसारख्या फलंदाजांना जीवदान लाभल्यास पाकच्या अडचणीत भरच पडेल. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात गलथान क्षेत्ररक्षणाचा फटका पाकला बसला. ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंच तसेच वॉनर्रला दिलेली जीवदाने पाकला महागडी ठरली, सामना गमावण्याची आफत त्यांच्यावर ओढवली. ३० धावांत कांगारुंचा निम्मा संघ गारद करणार्‍या मोहम्मद अमीरने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, परंतु ढिसाळ क्षेत्ररक्षणाने पाकचे विजयाचे स्वप्न हवेतच विरले. पाकची प्रभावी, भेदक गोलंदाजी आणि भारताची भक्कम फलंदाजी यांच्यातील द्वंद्व ओल्ड ट्रॅफर्डवर रंगतदार ठरेल, अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -