घरक्रीडाजागतिक कसोटी स्पर्धेबाबत उत्सुकता! -विराट

जागतिक कसोटी स्पर्धेबाबत उत्सुकता! -विराट

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सामने हे या दोन्ही संघांचे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिले दोन सामने असणार आहेत. कसोटी क्रिकेटला पुन्हा लोकप्रियता मिळावी, यासाठी आयसीसीने ही स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली असून श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातही एक सामना झाला आहे. दोन वर्षे चालणार्‍या या स्पर्धेत एकूण ७१ सामने होणार आहेत. आता या स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली उत्सुक आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. या स्पर्धेमुळे प्रत्येक कसोटी सामन्याचे महत्त्व वाढणार आहे. आता सर्व संघ कसोटी सामने अधिक जिद्दीने खेळतील आणि त्यामुळे सामने रंगतदार होतील. कसोटी क्रिकेट नष्ट होत चालले आहे, चाहते कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत आहेत, अशी चर्चा सुरू होती. मात्र, माझ्या मते मागील दोन वर्षांमध्ये सर्व कसोटी संघांनी त्यांचा खेळ उंचावला आहे. आता खेळाडूंनी आव्हान स्वीकारून कसोटी सामने जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे विराट म्हणाला.

- Advertisement -

या स्पर्धेचा अंतिम सामना जून २०२१ मध्ये इंग्लंड येथे होणार आहे. अंतिम सामन्यात खेळण्याचे सर्वच संघांचे लक्ष्य असेल, असे विराटला वाटते. तो म्हणाला, जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याचे सर्व संघांचे लक्ष्य असेल. त्यामुळे या स्पर्धेत रटाळ, अनिर्णित सामने पाहायला मिळणार नाहीत. प्रत्येक संघ जास्तीतजास्त गुण मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

फलंदाजांमध्ये सुधारणा गरजेची

- Advertisement -

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांनी मागील काही वर्षांत चांगली कामगिरी केलेली नाही, असे विराट कोहलीला वाटते. त्याच्या मते फलंदाजांनी स्वतःच्या विक्रमांसाठी नाही, तर संघासाठी खेळले पाहिजे. त्याने याबाबत सांगितले, कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे त्यांनी खेळात सुधारणा करणे गरजेचे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना दमदार कामगिरी करणे अवघड असते. आता जागतिक स्पर्धेमुळे चांगले प्रदर्शन करणे अधिकच अवघड होणार आहे, कारण सर्व निर्णयांचा परिणाम एकूण संघाच्या कामगिरीवर होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -