Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs ENG : डे-नाईट कसोटीत वेगवान गोलंदाजांकडे दुर्लक्ष करू नका!

IND vs ENG : डे-नाईट कसोटीत वेगवान गोलंदाजांकडे दुर्लक्ष करू नका!

वेगवान गोलंदाजांची भूमिकाही महत्वाची असेल, असे विराट कोहलीला वाटते.  

Related Story

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून दोन सामन्यानंतर ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आता या दोन संघांमधील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियममध्ये बुधवारपासून रंगणार आहे. हा कसोटी सामना प्रकाशझोतात (डे-नाईट) होणार असून या सामन्याची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल असे म्हटले जात आहे. परंतु, डे-नाईट कसोटीत खासकरून संध्याकाळच्या वेळी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. तसेच डे-नाईट कसोटीत वापरण्यात येणारा गुलाबी चेंडू लाल चेंडूपेक्षा अधिक स्विंग होतो. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाजांची भूमिकाही महत्वाची असेल, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीला वाटते.

गुलाबी चेंडू अधिक स्विंग होतो

या कसोटीत चेंडू फारसा स्विंग होणार नाही असे म्हटले जात आहे. परंतु, त्यात तथ्य नाही. गुलाबी चेंडू हा लाल चेंडूपेक्षा अधिक स्विंग होतो. आम्ही २०१९ मध्ये पहिल्यांदा डे-नाईट कसोटी सामना (बांगलादेशविरुद्ध) खेळलो होतो. त्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत फिरकीपटूंना मदत मिळेल यात शंका नाही. परंतु, वेगवान गोलंदाजांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या सामन्यात त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे, असे कोहलीने सांगितले.

कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ

- Advertisement -

खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळाल्यास याचा इंग्लंडला फायदा होऊ शकेल का? असे विचारले असता कोहली म्हणाला, इंग्लंडमध्ये चेंडू खूप स्विंग होतो. परंतु, आम्ही याआधी इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यात सक्षम आहोत. सध्याच्या घडीला आमची वेगवान गोलंदाजांची फळी जगात बहुधा सर्वोत्तम आहे. त्यामुळे आम्ही सर्व आव्हानांसाठी सज्ज आहोत.

- Advertisement -