घरक्रीडाधैर्यवान चेतन!

धैर्यवान चेतन!

Subscribe

चेतन चौहान यांचे भारतीय क्रिकेट आणि राजकारणाला मोठे योगदान आहे. खासकरून कसोटीत सातत्यपूर्ण कामगिरी करताना त्यांनी विंडीज, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांच्या तेजतर्रार गोलंदाजांचा अगदी धैर्याने सामना करत भारतासाठी २ हजारहून अधिक धावा केल्या होत्या.        

भारताचे माजी सलामीवीर आणि सुनील गावस्करचे भरवशाचे साथीदार चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन झाले. सुनीलसोबत दीर्घकाळ सलामी देणारा फलंदाज म्हणून चेतन चौहान यांचा उल्लेख करण्यात येतो. अतिशय धैर्याने लिली, थॉमसन, पॅस्को, हॅडली, इमरान  सर्फराज,  मार्शल, सिल्व्हेस्टर क्लार्क यांसारख्या गोलंदाजांना सामोरे जात चौहान यांनी सुनीलसह दहा शतकी भागीदाऱ्या रचल्या. मात्र, कसोटी शतकाने त्यांना कायम हुलकावणीच दिली.

चौहान यांनी कसोटी पदार्पण केले, ब्रेबर्न स्टेडियमवर १९६९ च्या मोसमात न्यूझीलंडविरुद्ध! टेलर, डेल हॅडली यांच्या भेदक माऱ्याला सामोरे जात त्यांनी १९ धावा केल्या, त्यात एक षटकाराचा समावेश होता. रणजी करंडकात त्यांनी मधू गुप्तेच्या साथीने दमदार शतकी सलामी करुन दिली, पण एक धीमा फलंदाज अशीच त्यांची प्रतिमा होती. परंतु, हेल्मेटच्या वापरामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. जगातील नामवंत तेजतर्रार गोलंदाजांना हसतमुखाने सामोरे जात त्यांनी २००० हून अधिक धावा फटकावल्या. यात १६ अर्धशतकांचा समावेश असून दोनदा ९०, तर पाचवेळा ८० हून अधिक धावा त्यांनी फटकावल्या होत्या, पण शतकी मजल काही त्यांना मारता आली नाही.

- Advertisement -

कसोटीतून निवृत्तीनंतर त्यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये विविध पदे भूषवली. तसेच राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत (२००१, २००७-०८) भारतीय संघाचे व्यवस्थापक, प्रशिक्षक म्हणून भूमिका चौहान यांनी सक्षमपणे निभावली. ऑस्ट्रेलियाशी त्यांचा विशेष संबंध आला. ८०-८१ दौऱ्यातील मेलबर्न कसोटीत पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवत कर्णधार गावस्करने मैदान सोडण्याचे ठरवले, तेव्हा विंग कमांडर दुराणी यांनी चौहान यांना मैदान न सोडता फलंदाजी करायला सांगितले आणि विश्वनाथचे शतक, तसेच चौहान यांच्या ७० धावांमुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली. भारताने ही कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

२००७-०८ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चौहान भारतीय संघांचे व्यवस्थापक होते. सायमंड्स-हरभजन यांच्यात मंकीगेट प्रकरण उद्भवले, तेव्हा चौहान यांनी सामनाधिकारी माईक प्रॉक्टर यांच्यासमोर भारताची बाजू नीट मांडून दौरा सुरळीत पार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

- Advertisement -

क्रिकेटप्रमाणेच राजकारणतही चौहान सक्रिय राहिले. लोकसभेत ते दोन वेळा खासदार होते. उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश होता. क्रिकेटपटू, तसेच क्रीडापटूंना करसवलती देण्यात याव्यात यासाठीही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हिंदी, इंग्रजीप्रमाणे मराठीवरही त्यांचे प्रभुत्व होते. पुण्यात त्यांचे बराच काळ वास्तव्य होते. दिल्लीला ते नंतर स्थायिक झाले. रणजी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना धावांच्या राशी उभारल्या, पण त्यांची क्रिकेट, तसेच राजकीय कारकीर्द बहरली ती राजधानी दिल्लीतच. बिशन बेदी, मदनलाल, मोहिंदर अमरनाथ, तसेच सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर या मुंबईकरांनीही या धैर्यवान फलंदाजाला आदरांजली वाहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -