घरक्रीडामॅक्सवेलवर इतका विश्वास येतो कुठून?

मॅक्सवेलवर इतका विश्वास येतो कुठून?

Subscribe

ग्लेन मॅक्सवेल विस्फोटक फलंदाज आणि उपयुक्त गोलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु, त्याला आयपीएलमध्ये म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. जवळपास प्रत्येक मोसमात त्याची कामगिरी खालावत आहे. मॅक्सवेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये आठ मोसम खेळले असून त्याला केवळ दोनदा २०० धावांचा टप्पा पार करता आला आहे. तसेच गोलंदाजीत तो एकदाही १० विकेट मिळवू शकलेला नाही. असे असतानाही दर लिलावामध्ये त्याच्यावर लागणारी बोली वाढत जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा खेळाडू लिलाव नुकताच पार पडला. आयपीएलला सर्वात श्रीमंत क्रिकेट स्पर्धा का म्हटले जाते, याचा प्रत्यय या लिलावामध्ये आहे. चार खेळाडूंवर तब्बल १४ कोटी किंवा त्याहून अधिक रुपयांची बोली लागली. आयपीएल स्पर्धेला २००८ मध्ये सुरुवात झाली आणि पहिल्या मोसमात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता तो भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी. धोनीला चेन्नई सुपर किंग्स संघाने ९.५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. पुढे काय झाले, हे सर्वांनाच माहित आहे. धोनी आणि चेन्नई हे आता जणू समीकरणच झाले आहे. परंतु, मोठी बोली लागलेल्या प्रत्येकच खेळाडूला अपेक्षित यश मिळते असे नाही.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचे एक उत्तम उदाहरण आहे. मॅक्सवेल विस्फोटक फलंदाज आणि उपयुक्त गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तसेच क्षेत्ररक्षक म्हणूनही तो उत्कृष्ट आहे. परंतु, त्याला आयपीएलमध्ये म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही.  आयपीएल संघ कोणत्याही खेळाडूला खरेदी करण्याआधी त्याच्याबाबत बराच अभ्यास करतात. प्रत्येक संघाची एक स्काऊटिंग टीम असते, जी विविध देशांतील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असते. त्यामुळे जवळपास प्रत्येक मोसमात कामगिरी खालावत जात असताना दर लिलावामध्ये मॅक्सवेलवर लागणारी बोली वाढत जाणे हे जरा आश्चर्यकारकच आहे.

- Advertisement -

मॅक्सवेलला यंदाच्या खेळाडू लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल १४.२५ कोटी रुपयांत खरेदी केले. तो यंदाच्या लिलावातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. केवळ दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिस (१६.२५ कोटी, राजस्थान) आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायेल जेमिसन (१५ कोटी, बंगळुरू) या दोघांना मॅक्सवेलपेक्षा मोठी किंमत मिळाली. मॅक्सवेलमधील गुणवत्तेबाबत आणि प्रतिभेबाबत शंका नाही. परंतु, त्याची आयपीएलमधील आजवरची कामगिरी पाहता, त्याच्यावर इतकी मोठी लागणे खरंच योग्य आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

मॅक्सवेल २०१२ मध्ये पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेत खेळला. त्याला या मोसमात केवळ दोन सामने खेळायची संधी मिळाली. मात्र, पुढील मोसमाआधीच्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला ५.३० कोटी रुपयांत खरेदी केले. तो २०१३ मोसमात केवळ तीन सामने खेळला आणि मोसमानंतर मुंबईने त्याला पुन्हा करारबद्ध न करण्याचा निर्णय घेतला. २०१४ चा मोसम मॅक्सवेलसाठी आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी मोसम ठरला. या मोसमाआधी त्याच्यावर किंग्स इलेव्हन पंजाबने ६ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. त्याने या मोसमातील १६ सामन्यांत ५५२ धावा चोपून काढल्या. या धावा त्याने तब्बल १८७.७५ च्या स्ट्राईक रेटने केल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर पंजाबने पहिल्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली.

- Advertisement -

या दमदार कामगिरीनंतर मॅक्सवेलचा खेळ अधिक उंचावेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु, त्याला या अपेक्षा काही पूर्ण करता आल्या नाहीत. २०१५ मोसमात १४५ धावा, २०१६ मोसमात १७९ धावा आणि २०१७ मोसमात ३१० धावा; या निराशाजनक कामगिरीमुळे पंजाबने त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने मॅक्सवेल आयपीएलला मुकला. परंतु, २०२० मध्ये त्याचे आयपीएल लिलावात पुनरागमन झाले आणि पंजाबने त्याला पुन्हा तब्बल १०.७५ कोटी रुपयांत खरेदी केले. मात्र, तो पुन्हा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. युएईमध्ये झालेल्या मागील मोसमात तो १३ सामन्यांत केवळ १०८ धावा करू शकला. त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. त्यामुळे पंजाबने दुसऱ्यांदा त्याला संघाबाहेर केले.

मॅक्सवेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये आठ मोसम खेळले असून त्याला केवळ दोनदा २०० धावांचा टप्पा पार करता आला आहे. तसेच गोलंदाजीत तो एकदाही १० विकेट मिळवू शकलेला नाही. असे असले तरी त्याला आयपीएलमध्ये सातत्याने संधी मिळत राहते. त्याच्यामध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता असून तो ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी करत असतो. परंतु, आता त्याने आयपीएल संघांना त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण वेळ आली आहे. अन्यथा पुढील लिलावात त्याच्यावर पुन्हा मोठी बोली लागण्याची शक्यता कमीच आहे.


मॅक्सवेलला लिलावात मिळालेली रक्कम 

   मोसम                   संघ                      किंमत             

   २०१३               मुंबई इंडियन्स             ५.३० कोटी   
   २०१४           किंग्स इलेव्हन पंजाब          ६ कोटी   
   २०१८             दिल्ली कॅपिटल्स           ९ कोटी    
   २०२०           किंग्स इलेव्हन पंजाब         १०.७५ कोटी    
   २०२१          रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू        १४.२५ कोटी 


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -