घरक्रीडाआयसीसी क्रिकेटर ऑफ द इयरच्या शर्यतीत ४ खेळाडू, भारतीय खेळाडूंचा समावेश नाही

आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयरच्या शर्यतीत ४ खेळाडू, भारतीय खेळाडूंचा समावेश नाही

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२१ च्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूची नामांकन यादी जाहीर केली आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना आयसीसी २०२१ सालचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. मात्र, अंतिम यादीत एकाही भारतीयाचे नाव नाही. विजेत्या खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी दिली जाणार आहे.

कसोटी कर्णधार म्हणून जो रूटसाठी हे वर्ष निराशाजनक ठरले असेल, पण त्याच्या बॅटने धावांचा पाऊस सुरूच ठेवला. रूटने या वर्षी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसह एकूण १८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ५८.३७ च्या सरासरीने १८५५ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा शतके झळकली. रूटने २०२१ वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत द्विशतक (२२८ धावा) करून केली. यानंतर त्याने चेन्नईमध्ये भारताविरुद्ध २१८ धावांची इनिंग खेळली. त्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चार कसोटी सामन्यांमध्ये ५६४ धावा केल्या, ज्यात तीन शतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेसच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्येही तो इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे.

- Advertisement -

केन विल्यमसनने त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडसाठी आयसीसी कसोटी विजेतेपद जिंकले. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने पहिल्या डावात ४९ आणि दुसऱ्या डावात नाबाद ५२ धावा केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात विल्यमसनच्या नेतृत्वाखाली किवी संघ उपविजेता ठरला होता. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या अंतिम सामन्यात विल्यमसनने ४३ चेंडूत ८५ धावा केल्या होत्या. केन विल्यमसनने यावर्षी १६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४३.३१ च्या सरासरीने ६९३ धावा केल्या, ज्यात एका शतकाचा समावेश आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने यावर्षी ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २२.२० च्या सरासरीने ७८ विकेट घेतल्या आहेत. ५१ धावांत सहा बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. या विश्वचषकात त्याने सहा सामन्यांत सात विकेट घेतल्या, ज्यामुळे संघ उपांत्य फेरीत पोहोचला. शाहीनने यावर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २३ विकेट घेतल्या. त्याचवेळी, कसोटी सामन्यांमध्ये शाहीनने १७.०६ च्या सरासरीने ४७ विकेट घेतल्या.

- Advertisement -

पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानसाठी २०२१ हे वर्ष खूप चांगले होते. या वर्षी त्याने ४४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५६.३२ च्या सरासरीने १९१५ धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने विकेटच्या मागे ५६ बळीही घेतले. रिझवानने यावर्षी २९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ७३.६६ आणि स्ट्राइक रेट १३४.८९ होता. कसोटी क्रिकेटमध्ये रिझवानने यावर्षी नऊ सामन्यांमध्ये ४५.५० च्या सरासरीने ४५५ धावा केल्या आहेत.


हेही वाचा : Under 19 Asia Cup: श्रीलंकेला ८ वेळा पराभूत करत भारताने जिंकला एशिया कप, वर्ल्डकपसाठी संघ तयार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -