Video: धोनी म्हणजे अविश्वसनीय प्रतिभा, लाखो लोकांची प्रेरणा – आयसीसी

माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकला, चॅम्पियन ट्रॉफी आणि टी२० देखील भारतीय संघाने जिंकून दाखवला. धोनीच्या कारकिर्दीवर बोलका असा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

ms dhoni
महेंद्र सिंह धोनी

‘जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देणारं नाव म्हणजे धोनी. या नावानं भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलवून टाकला. याशिवाय धोनी फक्त नावच नाही तर एक अविश्वसनीय अशी प्रतिभा आहे’, अशा शब्दात आयसीसीने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले आहे. सात जुलैला धोनीचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानेच आयसीसीने महेंद्र सिंह धोनीवर एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओत?

आयसीसीने शेअर केलेला व्हिडिओत धोनीच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला आहे. धोनीचे ड्रेसिंग रुममधून मैदानावर येणं आणि तिथून चाहत्यांचा हृदयात अधिराज्य गाजवणं, तो पूर्णत: चाहत्यांचा होणं, संपूर्ण स्टेडियममध्ये ‘धोनी-धोनी’ असा गजर होणं, या साऱ्या गोष्टी अत्यंत मनाला भिडणारे आहे. या व्हिडिओतील २०११ च्या विश्वचषकचा अंतिम सामना जिंकल्यावर युवराज सिंगने धोनीला मारलेली घट्ट मिठी डोळ्यांत पाणी आणणारी आहे. आयसीसीने या व्हिडिओत इंग्लंडचे फलंदाज जोस बटलर, बेन स्टोक्स, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज बुमराह यांचे धोनीबद्दलचे मतं जाणून घेतली आहेत.