घरक्रीडाभारतीय बॉलर्सची कांगारूंना वेसण! पहिल्या टेस्टमध्ये चोख कामगिरी!

भारतीय बॉलर्सची कांगारूंना वेसण! पहिल्या टेस्टमध्ये चोख कामगिरी!

Subscribe

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या अॅडलेड येथे सुरु असलेल्या पहिलया टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघ मजबूत स्थितीत असून शेवटच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ६ बॅट्समन्सला आऊट करावं लागणार आहे.

अॅडलेडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. भारतीय बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समन्सला चागलीच वेसण घातली असून त्या जोरावरच पहिल्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवसअखेर कांगारुंची अवस्था ४ आऊट १०४ अशी झाली आहे. भारताने दिलेल्या ३२३ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची भारतीय बॉलर्ससमोर चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे आता सोमवारी अर्थात पाचव्या दिवशी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अजून २१९ रन्स बनवावे लागणार आहेत. पण त्यांची समस्या अशी आहे की त्यांच्या हातात फक्त ६च विकेट शिल्लक आहेत!

ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सची हाराकिरी!

चेतेश्वर पुजारा (७१) आणि अजंक्य रहाणे (७०) या दोघांनी भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दमदार बॅटिंग करत ऑस्ट्रेलियासमोरचं टार्गेट ३२३ पर्यंत नेऊन ठेवलं. पण त्याचा सामना करण्यासाठी अॅरॉन फिंच आणि मार्कस हॅरिस ही ओपनिंग जोडी सपशेल अपयशी ठरली. अवघ्या २८ रन्सवर अॅरॉन फिंचचा मोठा अडथळा स्पिनर रवीचंद्रन अश्विनने दूर केला. ११ रन्सवर फिंच आऊट झाल्यानंतर फक्त १६ रन्सची भर घालून हॅरिसनेही परतीचा रस्ता धरला. मोहम्मद शमीने त्याला रिशभ पंतकडे कॅच द्यायला भाग पाडलं. तर पुढच्या १६ रन्सनंतर उस्मान ख्वाजानंही अश्विनच्या बॉलिंगवर रोहित शर्माकडे कॅच देत भारतीय बॉलिंगचा सामना करण्यात आपणही असमर्थ असल्याचं स्पष्ट केलं.

- Advertisement -

मार्श-हेडची भागीदारी

पुढच्या १६ रन्सनंतर म्हणजेच ऑस्ट्रेलियाचे ८४ रन झालेले असताना पहिल्या इनिंगमध्ये टीमचा डाव सावरणारा पीटर हॅण्ड्सकॉम्बदेखील हार मानून शमीच्या बॉलिंगवर माघारी परतला. शेवटी शॉन मार्श आणि ट्रॅविस हेड या दोघांनी डाव सावरत एकही विकेट पडू दिली नाही. पण सगळं करूनही ऑस्ट्रेलियाचा डाव फक्त १०४ रन्सपर्यंतच पोहोचू शकला.


हेही वाचा – मैदानात गंभीर, मैदानाबाहेर गौतम

सकाळचं पहिलं सत्र महत्त्वाचं

शेवटच्या दिवशी म्हणजे पाचव्या दिवशी आता ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी अजून २१९ रन्स हवे आहेत. शॉन मार्श आणि ट्रॅविस हेडने दोन्ही बाजूंनी डाव सावरून धरला असला, तरी सकाळच्या पहिल्या सेशनमध्ये दोघांना देखील जपूनच बॅटिंग करावी लागणार असल्याचं मत जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. नाहीतर पुन्हा पहिल्या इनिंगचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे टीम इंडिया जिंकण्यासाठीच खेळत असल्यामुळे आणि भारतीय बॉलिंग भेदक ठरत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समन्ससमोरचं आव्हान कठीण दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -