घरक्रीडाIND vs AUS : टीम इंडियाचे लक्ष्य दौऱ्याची सुरुवात 'फ्रंटफूट'वर करण्याचे !

IND vs AUS : टीम इंडियाचे लक्ष्य दौऱ्याची सुरुवात ‘फ्रंटफूट’वर करण्याचे !

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना आज होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना आज होणार आहे. या सामन्याने भारताच्या दौऱ्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे भारत हा सामना जिंकत या दौऱ्याची ‘फ्रंटफूट’वर सुरुवात करण्यास उत्सुक असेल. पण ऑस्ट्रेलियाकडेही असे खेळाडू आहेत जे एकहाती सामना जिंकवू शकतात.

मागील काही काळात खराब प्रदर्शन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या टी-२० मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात आहे. याचे कारण मार्चमध्ये झालेल्या द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगमुळे बंदी घातलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. ऑस्ट्रेलियाने जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेला टी-२० सामना गमावला. त्यानंतर झिम्बाब्वेमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात त्यांचा पाकिस्तानने पराभव केला. तर पाकिस्तानविरुद्धच युएईमध्ये झालेली टी-२० मालिका त्यांनी ३-० अशी गमावली. तर मागील शनिवारी त्यांचा द.आफ्रिकेने पराभव केला होता. त्यामुळे त्यांना मागील काही काळात मोठ्या संघांविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्यात अपयश आले आहे.

भारताची दमदार कामगिरी 

याउलट भारताने मागील ७ टी-२० मालिका जिंकल्या आहेत. भारताने नुकतीच झालेली वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका ३-० अशी जिंकली. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली खेळला नव्हता. त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ अधिकच मजबूत झाला आहे. भारताने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ३-० असा पराभव केला होता. त्या मालिकेत कोहलीने १९९ धावा केल्या होत्या. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच चांगले प्रदर्शन करतो. त्याच्याकडून या मालिकेतही भारतीय संघाला सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल.

ऑस्ट्रेलियाकडे मॅचविनर खेळाडू

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांचे मागील काही काळातील प्रदर्शन आणि सध्याचा फॉर्म लक्षात घेता भारताचे पारडे जड मानले जात असले तरी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात खेळण्याचा फायदा मिळू शकतो. त्यातच त्यांच्याकडे अॅरॉन फिंच, क्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल असे मॅचविनर खेळाडूही आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला कमी लेखणे भारताला महाग पडू शकते. एकूणच ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्वीइतका मजबूत नसला तरी ते आपल्या दिवशी कोणालाही हरवू शकतात. त्यामुळे ही टी-२० मालिका उत्कंठावर्धक होईल हे निश्चित.

प्रतिस्पर्धी संभाव्य संघ 

भारत – शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया – अॅरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, क्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, बेन मॅकडरमॉट, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), नेथन कुर्टर-नाईल, अँड्रयू टाय, बिली स्टॅन्लेक, जेसन बेहरनडॉर्फ

भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिला टी-२० सामना
वेळ – दुपारी १:२० पासून 
थेट प्रक्षेपण – सोनी सिक्स 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -