घरक्रीडाIND vs AUS : कोण ठरणार 'टेस्ट मे बेस्ट' ?

IND vs AUS : कोण ठरणार ‘टेस्ट मे बेस्ट’ ?

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेपाच वाजता हा सामना सुरु होईल.

क्रिकेट चाहते ज्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते त्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे होणार आहे. या मालिकेत बॉल टॅम्परिंगमुळे बंदी घातलेले ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर खेळू शकणार नसल्याने भारताचे पारडे जड मानले जात आहे. पण भारतीय संघाला मागील काही काळात परदेशात सातत्यपूर्ण कामगिरी करता न आल्याने ऑस्ट्रेलियालासुद्धा ही मालिका जिंकण्याची संधी आहे.

भारताचा ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड चांगला नाही 

भारताची ऑस्ट्रेलियातील कामगिरी चांगली नाही. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ४४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी ५ सामने भारताने जिंकले आहेत, तर २८ सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ११ सामने हे अनिर्णित संपले आहेत. तसेच भारताने ऑस्ट्रेलियात एकूण १२ कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी ९ मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत, तर ३ मालिका बरोबरीत संपल्या आहेत. भारताला ऑस्ट्रेलियात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र भारताला यावेळी हा रेकॉर्ड बदलण्याची चांगली संधी आहे.

अॅडलेडची खेळपट्टीवर जास्त गवत   

या मालिकेतील पहिला कसोटी सामना अॅडलेड येथे होणार आहे. अॅडलेडची खेळपट्टी ही साधारणपणे फिरकी गोलंदाजांना मदत देणारी असते. पण भारताकडे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव सारखे फिरकीपटू असल्यामुळे अॅडलेडच्या खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्याचा निर्णय क्युरेटरने घेतला आहे. असे असले तरी भारतीय वेगवान गोलंदाजांनी मागील काही काळात परदेशात ज्याप्रकारे प्रदर्शन केले आहे ते लक्षात घेता ते ही या खेळपट्टीचा फायदा घेऊ शकतील. भारतीय संघ या सामन्यात ३ वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांचे संघातील स्थान जवळपास निश्चित आहे, तर तिसऱ्या वेगवान गोलंदाजांचे स्थान मोहम्मद शमी किंवा भुवनेश्वर कुमारला मिळण्याची शक्यता आहे.

फलंदाजांना खेळ उंचावण्याची गरज 

भारतीय कर्णधार विराट कोहली वगळता इतर फलंदाजांना सातत्यपूर्ण प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. त्यातच कसोटी मालिकेआधी झालेल्या सराव सामन्यात युवा सलामीवीर पृथ्वी शॉ ला दुखापत झाल्याने तो पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना भारताच्या डावाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. या दोघांनाही सातत्याने धावा करण्यात अपयश आले आहे. पण सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी चांगली फलंदाजी करून आपण कसोटी मालिकेसाठी तयार असल्याचे दाखवून दिले. मधल्या फळीत अनुभवी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे खेळतील. सहाव्या क्रमांकावर हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर यष्टिरक्षणाची धुरा रिषभ पंत सांभाळेल. स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत झाली असली तरी त्यांची गोलंदाजी पूर्वीइतकीच मजबूत आहे. त्यांच्याकडे मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नेथन लायनसारखे घातक गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा करण्यासाठी झुंजावे लागणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -